हिवरखेड विकास मंच आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे मोदींजींना साकडे
अडगांव बु प्रतिनिधी:- दिपक रेळे
उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा सर्वात जवळचा आणि 2012 पासून मंजुरात असलेल्या अकोला इंदौर रतलाम ब्रॉडगेज प्रकल्पातील अकोट- आमला खुर्द या टप्प्याचे काम मेळघाट मधील जुन्या मार्गावरून करावे की प्रस्तावित नवीन मार्गावरून व्हावे याबाबत राजकारण प्रचंड तापले असून ह्या वादाला केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, भाजप विरुद्ध शिवसेना, पर्यावरणप्रेमी विरुद्ध विकास प्रेमी, अमरावती जिल्हा विरुद्ध बुलढाणा जिल्हा असे विविध द्वंदाचे स्वरूप मागील काही दिवसात प्राप्त झाले आहे. त्यामुळे ह्या मार्गाचे काम सुरू होण्याऐवजी हा विषय प्रचंड रेंगाळत असून गुंतागुंतीचा झाला आहे.
विशेष म्हणजे मेळघाट मधून ब्रॉडगेजचे काम सुरू करण्यास पूर्ण परवानगी नसतानाही जुनी मीटरगेज रेल्वे अकोट ते मध्यप्रदेश पर्यंत का सुरू ठेवण्यात आली नाही?? हा मोठा प्रश्न आहे. याउलट मीटरगेज रेल्वेचे रुळ सुद्धा जाणीवपूर्वक उखडून टाकण्यात आले. ज्यामुळे रेल्वे प्रवाशांचा महाराष्ट्र-मध्यप्रदेश हा सर्वात जवळचा रेल्वे संपर्क तुटला आहे. आणि वेळ श्रम पैसा वाया जात आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशात ज्या मार्गावर ब्रॉडगेज परिवर्तन बाकी आहे अशा महु पातालपानी कालाकुंड ओंकारेश्वर ह्या मार्गावर तेथील लोकप्रतिनिधी आणि नागरिक जागृत असल्याने ब्रॉडगेज चे काम सुरू होईपर्यंत मिटरगेज रेल्वेलाच हॅरिटेज ट्रेन चा दर्जा देण्यात आला आणि रेल्वे सेवा सुरूच ठेवण्यात आली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ह्या मार्गाला आदिवासींच्या अस्मितेचा विषय बनवून संसदेत हुंकार दिली आणि रेल्वेमंत्र्यांना उत्तर देण्यास भाग पाडले.
आपापले तर्क देऊन मेळघाट मधूनच आणि मेळघाटच्या बाहेरून रेल्वेमार्ग करणेबाबत दोन्ही मार्गाच्या समर्थकांनी हा अस्मितेचा विषय बनविला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही मार्गाच्या मागण्यांमध्ये तथ्य असून सर्वांचीच मागणी रास्त आहे. यामध्ये आता सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांच्या पुढाकारातून हिवरखेड विकास मंच आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने सुवर्णमध्य सुचविला आहे. यासंदर्भात पत्रकार भवन हिवरखेड येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि हिवरखेड विकास मंच यांची संयुक्त बैठक पार पडली ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज, माजी सरपंच संदीप इंगळे, राजेश पांडव, अर्जुन खिरोडकार, जितेश कारिया, राहुल गिर्हे, सूरज चौबे, उमर बेग मिर्झा, जावेद खान, अनिल कवळकार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ह्यावेळी रेल्वे संबंधी सर्वंकष चर्चा पार पडली.
बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांच्या तुलनेत विदर्भ आणि मध्यप्रदेशातील रेल्वेमार्गाचे जाळे अत्यंत कमी असून रेल्वे मार्गाचे जाळे वाढविणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने खालील मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
हिवरखेड- वानरोड- धुळघाट- डाबका- तुकईथड (मध्य प्रदेश) ह्या मेळघाट मधून जाणाऱ्या जुन्या मार्गावर मिटरगेज रेल्वे पूर्ववत तात्काळ सुरू करावी. जेणेकरून महाराष्ट्र मध्य प्रदेश तात्काळ जोडले जाईल.
अकोला खंडवा इंदौर हा ब्रॉडगेज प्रकल्प हिवरखेड, सोनाळा, जामोद, उसरणी, खकनार, खिडकी, तुकईथड ह्या प्रस्तावित नवीन मार्गाने करण्यात यावा.
ज्यामुळे हा तेल्हारा, संग्रामपूर, जळगाव जामोद, या तालुक्यांना आणि लक्षावधी जनतेला प्रगतीपथावर नेणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल. हिवरखेड आणि तुकईथड येथे जंक्शनचा दर्जा देण्यात यावा येथे ब्रॉडगेज आणि मिटरगेज रेल्वे सेवा एकत्रित येतील.आणि हिवरखेड चे नवीन रेल्वे स्टेशन हे गावानजीक व्हावे
उपरोक्त मागण्यांचे निवेदन मा. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, अमरावती, अकोला बुलढाणा, बुरहानपुर, खंडवा चे खासदार आणि सर्व संबंधित मान्यवरांना पाठविण्यात येणार आहेत.