मेट्रोची ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ संकल्पना जोमात
नागपूर , ता. १२ : धावत्या मेट्रोमध्ये वाढदिवसाचे किंवा अन्य कार्यक्रमांचे सेलिब्रेशन….ही संकल्पनाच धम्माल आहे ना….! तर मग सज्ज व्हा धम्माल करण्यासाठी….सेलिब्रेशन ऑन व्हील करण्यासाठी….नागपूर मेट्रोने यासाठी एक आगळीवेगळी संकल्पना मांडली आणि अल्पावधीतच या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.
मेट्रोने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे सुरू केले आहे. धावत्या गाडीत वाढदिवस साजरा करायचा असेल तर आता मेट्रो तुम्हाला भाड्याने मिळेल. त्यासाठी केवळ तीन हजार रुपये मोजावे लागतील. फक्त वाढदिवसच नव्हे तर इतरही उत्सवी कार्यक्रमासाठी ही योजना आहे. ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ असे त्याला नाव देण्यात आले आहे. नागपुरातील मेट्रो ही जागतिक दर्जाची असल्याचा दावा नेहमीच केला जातो. अतिशय विक्रमी वेळेत तिचे दोन टप्पे सुरू झाले. प्रवासी वाढावे म्हणून महामेट्रो अनेक उपक्रम राबवत आहे. नव्या योजनेनुसार, तुम्ही तुमचा वाढदिवस धावत्या मेट्रोत साजरा करू शकता. ३ कोचच्या मेट्रोमध्ये आयोजकांना १५० जणांना बोलवता येईल. मेट्रोची क्षमता जास्त असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता एका वेळी केवळ १५० जणांना प्रवेश असेल.
सेलिब्रेशनसाठी तुम्हाला मेट्रोची बुकिंग करायची असेल तर एका तासाकरिता केवळ तीन हजार रुपये भाडे आकारले जाईल. अतिरिक्त वेळेकरिता दोन हजार प्रति तास द्यावे लागेल. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी महामेट्रो सजावट करून देणार आहे. केवळ नागपुरातीलच नव्हे तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसह पश्चिम विदर्भातील नागरिकही या ‘सेलिब्रेशन’चा आनंद घेऊ शकतील. यासाठी सात दिवसअगोदर मेट्रोचे मुख्यालय असलेल्या दीक्षाभूमीसमोरील मेट्रो भवन येथे बुकिंग करावी लागेल. अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी ०७१२-२५५४२१७, ७८२७५४१३१३, ८३०४१८०६५, ९३०७९०११८४ येथे संपर्क साधू शकता. akhilesh.halve@mahametro.org या मेलवरही आपण संपर्क साधू शकता. चला तर मग तयार व्हा….सेलिब्रेशनसाठी….!