सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मुलीवर सामूहिक बलात्कार करून जीवे मारून टाकण्यात आल्याची अमानुष घटना घडली. या घटनेनंतर या मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना तीचे अंतिम दर्शन सुद्धा घेऊ न देताच पोलिसांनी रातोरात अंत्यसंस्कार केले. या कुटुंबियांच्या भेटीसाठी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी भेटण्यासाठी गेले असतांना त्यांना धक्का बुक्की करण्याचा प्रकार घडला. या दोनही घटना लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणाऱ्या घटना असल्याची टीका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडित महिलेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्का बुक्की करण्यात आली तसेच कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेनंतर छगन भुजबळ यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, उत्तर प्रदेशातील एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जीवे मारून टाकण्याची अमानुष घटना घडली. ही मुलगी मृत्युमुखी पडल्यावर घरी आणून तिच्यावर कुटुंबियांच्या पद्धतीने अंत्यविधी करण्याची गरज असतांना पोलिसांनी कुटुंबियांना डांबून ठेऊन रातोरात अंत्यविधी केला हा प्रकार तरी काय आहे असा सवाल गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले की, या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी गेले असतांना पोलिसांनी त्यांना धक्का बुक्की करण्याची गरज नाही. देशातील एका मोठ्या नेत्याला अशी वागणूक मिळते याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच कुठल्याही नेत्याला अशी वागणूक देणं ही बाब निषेधार्ह आहे. इकडे महाराष्ट्रात काही नसतांना महाराष्ट्राच्या पोलिसांना बदनाम केलं जातं आणि उत्तर प्रदेशात काय नेमकं काय घडतंय असा सवाल उपस्थित करत सगळ्या देशातील जनतेने याचा निषेध करायला हवा असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, कुठल्याही पीडितेचे अश्रू पुसण्यासाठी शांततेने भेटायला जाणाऱ्या लोकांना अशी वागणूक दिली जाते हे अत्यंत घृणास्पद आहे. गरिबांवर अत्याचार होत असतांना त्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा त्यांना बंदिस्त करून ठेवणं हे चुकीचं आहे. हा देश महात्मा गांधी व गौतम बुद्धांचा हा देश आहे या भारताला हे अभिप्रेत नाही. या दोनही घटना लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या या घटना आहे. हा निषेध कोण्या एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात निषेध असून त्यासाठी देशातील जनतेने एकत्र येत निषेध करायला हवा असे त्यांनी यावेळी सांगितले.