कोरोनामुळे व्यापारी हतबल, सरकारच्या बुस्टरची गरज!; विशेष मुलाखतीत शेखर नागपाल यांची आग्रही मागणी, शेगावातील व्यापार्‍यांच्या मांडल्या समस्या; तरुणांना म्हणाले आत्मनिर्भरतेशिवाय पर्याय नाही!

 

शेगाव (आयुषी दुबे)

 

देशाच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या व्यापार्‍यांच्या मागण्यांकडे प्रशासकीय, शासकीय स्तरावरून सातत्याने दूर्लक्ष केले जाते. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक अडचणी जशा आहेत तशाच राहतात. त्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुलडाणा लाइव्हने पुढाकार घेत थेट भेट या उपक्रमात आज, 3 डिसेंबरला अखिल भारतीय व्यापारी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शेखर नागपाल यांची मुलाखत घेतली. शेगाव शहरातील व्यापार्‍यांच्या समस्या, त्यावर परिषदेच्या माध्यमातून वेळोवेळी काढण्यात आलेला तोडगा, सरकार दरबारी केलेला पाठपुरावा आणि संघटना म्हणून झालेल्या एकूण कामगिरीचा आलेख श्री. नागपाल यांनी बुलडाणा लाइव्हकडे मांडला. कोरोनामुळे व्यापारी हतबल झाले आहेत. ते पुन्हा आर्थिक प्रवाहात येतील, यादृष्टीने सोयीसवलतींचे बुस्टर व्यापार्‍यांना सरकारने देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
श्री. नागपाल हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शेगाव येथील अध्यक्ष असून, शेगाव प्रवासी संघटना आणि गणेश नवदुर्गा उत्सव मंडळाचेही अध्यक्ष आहेत. शिवाय शांतता समिती सदस्य आहेत. त्यांचा स्वतःचा हॉटेल व्यवसाय आहे. 2019 मध्ये त्यांनी अखिल भारतीय व्यापारी परिषदेची स्थापना केली. कोरोना काळात व्यापार्‍यांना ज्या ज्या अडचणी आल्या त्या त्यांनी अध्यक्ष या नात्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले. शहरातील व्यापार्‍यांच्या हितासाठी जे काही चांगले निर्णय घेता येतील ते निर्णय घेतले. कोरोना काळात सरकारने लावलेले काही प्रतिबंध व्यापार्‍यांना नुकसानकारक होते. त्यावर परिषदेने आवाज उठवला. नगरपरिषद हद्दीतील गाळ भाडे माफ करण्यासाठी हायकोर्टात पीटिशन दाखल केले. कोरोना काळातील व्यापार्‍यांचे वीजबिल माफ करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. परिषदेने केवळ व्यापारीच नाही तर सामान्यांनाही मदतीचा हात दिला. कोरोनाविषयी सतत जनजागृती करण्यात आली. अनेक गोरगरिबांना मदत करण्यात आली. परिषदेच्या माध्यमातून विविध असोसिएशन स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये किराणा असोसिएशनचे अध्यक्ष मोहन शेठ अग्रवाल असून, सलून असोसिएशनचे अध्यक्ष अशोकभाऊ राठोड, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शेखर नागपाल, मोबाईल व कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष अमित जाधव, बिछायत असोसिएशनचे अध्यक्ष विजय लांजुळकर, त्याचप्रमाणे विविध विभागांचे असोसिएशन अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. परिषदेला कायदेविषयक मार्गदर्शन अ‍ॅड. पी. आर. डागरा, अ‍ॅड. वासुदेव मिरगे, अ‍ॅड. कैलास गुप्ते, अ‍ॅड. श्री. मल, अ‍ॅड. जैन त्याचप्रमाणे गावातील वरिष्ठ व्यापारी जगदीश नारोलिया, निळू पाटील, मोहनशेठ अग्रवाल आदी वरिष्ठ व्यापार्‍यांचे मार्गदर्शन सतत मिळत असल्याचेही श्री. नागपाल यांनी सांगितले.

व्यावसायिक पार्श्‍वभूमी…

श्री. नागपाल यांचा हॉटेल व्यवसाय वडिलोपार्जित असून, वडिलांनंतर तो त्यांच्याकडे वडिलांप्रमाणेच त्यांनी या व्यवसायाचा लौकिक वाढवला आहे. त्यांना तीन भाऊ आहेत. पत्नी, मुलगा, मुलगी, दोन पुतणे असा आप्त परिवार आहे.

पार्किंग व्यवस्था नसल्याने…

शेगाव शहरात अनेक समस्या व्यापार्‍यांना भेडसावत असतात. त्यात प्रामुख्याने पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे बिनकामाच्या गाड्या सुद्धा दुकानांसमोर लागत असतात. त्यामुळे दुकानात यायला रस्ता राहत नाही. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था किंवा नियोजन करण्यात यावे, अशी व्यापार्‍यांची मागणी आहे. नगरपरिषदेने कर वाढविला आहे त्या तुलनेत सुविधा नाही. करात सवलत देण्याची गरज आहे. सध्या बँकांनी सक्तीची वसुली सुरू केली आहे. कोरोना काळात व्यापार बंद होता. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या सर्व समस्यांचे निराकरण सरकारकडे करण्याची मागणी व्यापार्‍यांच्या वतीने करण्यात आल्याचे श्री. नागपाल यांनी सांगितले.

नव्या पिढीला आत्मनिर्भरतेचा सल्ला

शेखर नागपाल यांनी नव्या पिढीला आत्मनिर्भरतेचा सल्ला दिला आहे. नवतरुणांनी व्यवसायात येऊन आत्मनिर्भर व्हावे. व्यवसायात आल्यानंतर त्यांना येणार्‍या समस्यांचे निराकरण अखिल भारतीय व्यापारी परिषदेच्या माध्यमातून आम्ही निश्‍चित करू, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.

जीएसटी कायद्यात बदल अपेक्षित…

जीएसटीमुळे खरोखरच व्यापार्‍यांची कंबर मोडली आहे. सरकारने या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. परंतु प्रामुख्याने सर्वात पहिले ऑनलाइन व्यवसाय बंद झाला पाहिजे. या व्यवसायामुळे अनेक व्यापार्‍यांना समस्येला सामोरे जावे लागत आहे आणि जीएसटीचा विचार केला असता जीएसटी हा खूप मोठा अभ्यासाचा विषय झाला असून खरोखरच जीएसटीमुळे व्यापार्‍यांना खूप त्रास होत आहे, अशी भावना श्री. नागपाल यांनी मांडली.

व्यापार्‍यांवरील बंधने कमी करा…

खरं तर सरकारने दिलेले नियम हे व्यापार्‍यांसह नागरिकांनी सुद्धा पाळावे. परंतु काही नियमांमुळे व्यापार्‍यांना अडचणी येतात त्या नियमांमध्ये निश्‍चितच बदल करणे गरजेचे आहे. व्यापार्‍यांमुळे सरकारी तिजोरीत कराच्या रूपाने महसूल जमा होतो. त्यामुळे जास्तीची बंधने व्यापार्‍यांवर न लावता नियमांमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

सरकारकडून काही अपेक्षा?

अध्यक्ष या नात्याने संत नगरीतील नागरिक म्हणून मी सरकारकडे एकच विनंती करेन की संतनगरी शेगावमध्ये औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून विविध प्रकारच्या औद्योगिक कंपन्या शेगावमध्ये आणून शेगावातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून तालुक्यातील व शहरातील तरुणांना गावाबाहेर रोजगार शोधण्याकरिता जाण्याची गरज पडणार नाही. त्याचप्रमाणे रेल्वेचे माल गोडाऊन खामगाववरून शेगावला स्थलांतरित करण्यात यावे किंवा नवीन गोडाऊनची स्थापना करण्यात यावी. जेणेकरून शेगाव शहरातील व्यापाराला चालना मिळेल. हमालांच्या हाताला काम मिळेल. तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल, असे श्री. नागपाल म्हणाले.

Leave a Comment