अजहर शाह मोताळा प्रतिनिधी
27 ग्रामपंचायतीमध्ये 95 सदस्यांची अविरोध निवड
बुलडाणा दि. 5 जानेवारी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी काल 4 जानेवारी रोजी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख होती. त्यानुसार जिल्ह्यामध्ये काल 4 जानेवारी रोजी 3007 उमेदवारांकडून 3104 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. या माघारीनंतर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले असून ग्राममपंचायतीसाठी 9664 उमेदवार निवडणूकींच्या रिंगणात आहेत. मात्र जिल्ह्यात निवडणूकीला फाटा देत 27 ग्रामपंचायतींमध्ये अविरोध सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या 27 ग्रामपंचायतींमध्ये 95 सदस्य अविरोध निवडून आले आहेत.
जिल्ह्यात अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 527 ग्रामपंचायतींसाठी 13 हजार 320 उमेदवारांकडून 13 हजार 609 अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी झालेल्या छाननीमध्ये 179 उमेदवारांचे 210 अर्ज नांमजूर करण्यात आले. छाननीअंती बाद झालेल्या अर्जानंतर 13 हजार 141 उमेदवारांचे 13 हजार 399 अर्ज शिल्लक आहेत. सध्या माघारीनंतर 9 हजार 664 उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. सर्वात जास्त 1387 उमेदवार खामगांव तालुक्यात असून अर्ज 1405 आहेत. बुलडाणा तालुक्यात 1171 उमेदवार, चिखलीमध्ये 1110, दे. राजा तालुक्यात 262, सिं. राजामध्ये 610, मेहकरमध्ये 795, लोणार तालुक्यात 301, शेगांव तालुक्यात 635, जळगांव जामोदमध्ये 456, संग्रामपूर तालुक्यात 574, मलकापूरमध्ये 581, नांदुरा तालुक्यात 776 व मोताळा तालुक्यात 1006 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.