जळगाव जामोद येथील अट्टल चोरटा जेरबंद

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

बंद घरातले दिवे चालू-बंद होत असल्याने शेजार्‍यांना शंका आली. त्यांनी लगेच पोलिसांना कळवले. पोलिसांनीही वेळ न दवडता धाव घेतली आणि दबा धरून बसलेल्या चोराच्या मुसक्या आवळल्या. गेल्या काही दिवसांत शहर, तालुक्यात झालेल्या घरफोड्या या चोरानेच केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जामोद शहरात व तालुक्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. काही ठिकाणी मंदिराची दानपेटी फोडली जात असे तर काही ठिकाणी कोणी घरी नसताना रात्री घर फोडले जात होते. यामुळे पोलिस प्रशासन मात्र चिंताग्रस्त झाले होते. ठाणेदार सुनील जाधव यांनी शहरातील पोलिसांची रात्रीची गस्त वाढवली. परंतु कोणतेही धागेदोरे हाती लागत नव्हते. 2 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर दोन-तीनच्या सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की महसूल कॉलनीमधील तुळशीराम हरिभाऊ भड मागील काही दिवसांपासून घरी नाहीत. परंतु त्यांच्या घरातील लाईट चालू बंद होत आहे. ही माहिती गस्तीवर असलेले पी.एस.आय. प्रल्हाद मदन व त्यांचे सहकारी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा तोडलेला होता. घरातील सामान अस्तव्यस्त फेकलेले होते. चोर हा दबा धरून बसला होता. पीएसआय श्री. मदन व त्यांच्या सहकार्‍यांनी त्याला रंगेहात पकडले. जियाउल्लाखाँ असतुल्ला खाँ असे या चोरट्याचे नाव असून, तो नांदुरा येथील आहे. त्याचा शहरात अनेक ठिकाणच्या चोर्‍यांत सहभाग असू शकतो. तपास जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रल्हाद मदन, एएसआय श्री. गव्हाळे, कॉन्स्टेबल श्री. राजपूत, कॉन्स्टेबल इरफान शेख व कॉन्स्टेबल योगेश निंबोळकर करत आहेत.

Leave a Comment