अजहर पठाण
सेलू/परभणी
– मागील महिन्यामध्ये जिंतूर व सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झाला आहे.त्यात प्रत्येक महसूल मंडळामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे सरसकट नुकसान झालेले आहे त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, विहिरी पडल्या आहेत, अनेक जनावरे दगावले आहेत अशा प्रकारचे आसमानी संकट कोसळले आहे. तर खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, हळद, ऊस व फळबागांचे अतोनात नुकसान झालेले आहे. व हे नुकसान सरसकट सर्व परिसरात व सर्व महसूल मंडळात झालेले आहे.
परंतु, महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी अहवालानुसार जिंतूर तालुक्यात फक्त तीन व सेलू तालुक्यात फक्त दोन महसूल मंडळे अतिवृष्टी बाधित घोषित केली आहेत. तर उर्वरित जिंतूर तालुक्यातील पाच मंडळे बामणी, आडगाव, संवगी म्हा, दुधगाव व जिंतूर आणि सेलू तालुक्यातील तीन कूपटा, चिकलठाणा व वालुर, असे एकूण आठ मंडळे वगळण्यात आले आहेत. तरी या आठही मंडळामध्ये सरसकट अतिवृष्टी घोषित करावी आणि मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी घोषित केलेली नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी परभणी श्री मुगळीकर यांना देण्यात आले.
यावेळी आ.बाबाजानी दूररानी माजी आ. विजय भांबळे, यांच्यासह जि.प.सदस्य प्रसादराव बुधवन्त, बाळासाहेब घुगे, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे, अभिनय राऊत, बाळासाहेब रोडगे, अशोक काकडे, रामराव उबाळे, राजेंद्र लहाने, मनोज थिटे, गणेशराव इलग, चंद्रकांत गाडेकर,पुरुषोत्तम पावडे, रामेश्वर गाडेकर, आनंद डोईफोडे प्रभाकर गिराम इ उपस्थित होते.