योगेश नागोलकार
राहेर : श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीच्या दिवशी येणारा हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी घराघरातून नागदेवतेची पूजा केली जाते. महिला, मुली, नवविवाहिता यांच्यासाठी हा सण विशेष असतो; परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागातील नागपंचमीनिमित्तचे झोके, झिम्मा फुगडी दुर्मीळ होत चालले आहेत.
पातुर तालुक्यातील राहेर परिसरासह आदी गावांत मोठमोठी निंबाची झाडे होती. त्या झाडांना गावांमध्ये सार्वजनिक झोके असायचे. नागपंचमीनिमित्त गावातील तरुण, पुरुष, महिला या झोक्याचा आनंद लुटत असत. ग्रामीण भागामध्ये नागपंचमीच्या काळामध्ये स्त्रिया एकत्र येऊन झिम्मा फुगडी, फेर धरणे असे खेळ खेळत; परंतु दोन वर्षांपासून कोरोना महामारी, आधुनिक जीवनशैलीमुळे अस्सल ग्रामीण खेळ कालबाह्य ठरत आहेत. त्यामुळे पंचक्रोशीत परिसरात झोका दुर्मीळ झाला आहे.
मोठमोठी चिंच, वड, लिंब, आंबा अशा झाडांना दिसणारे झोके आता घरातील बाल्कनी अथवा गच्चीत दिसू लागले आहेत. ग्रामीण भागात नागपंचमीच्या अगोदर आठ दिवसांपासूनच महिला एकत्र येऊन फेर धरणे, वेगवेगळी गाणी म्हणणे, असे खेळ हल्ली दुर्मीळ झाले आहेत. नवविवाहित मुलींसाठी नागपंचमी हा सण विशेष महत्त्वाचा असतो.