राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा टप्पा नुकताच पार पडला. आता 1 एप्रिल 2021 ते 30 मार्च 2022 या वर्षात राज्यातील पाच हजार ग्रामपंचायतींसह 27 जिल्हा परिषदा, 20 महापालिका, 300 नगरपालिका तथा नगरपंचायती आणि 325 पंचायत समितींच्या निवडणूका होणार आहेत.
https://www.suryamarathinews.com/post/8096
ग्राम विकास विभागाने या काळात मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची यादी तयार केली असून निवडणूक आयोगालाही सादर केल्याचे ग्रामविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
‘महाविकास’ आघाडी लढणार स्वबळावर
शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करीत राज्याच्या सत्तेच्या चाव्या हाती घेतल्या.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडीबद्दलची नापसंती दिसून आली.
ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक फटका शिवसेनेला बसल्याची चर्चा आहे. दरम्यान, आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा विस्तार होणार नाही, याची खबरदारी घेत महाविकास आघाडी आता स्वबळावर लढेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
महाविकास आघाडीचे सूत जागा वाटपातही जमणार नाही, बंडखोरी वाढण्याची भिती वर्तविली जात आहे. त्यामुळे आपापल्या पक्षाची ताकद दाखविण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आता स्वबळावर लढतील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तविला जात आहे.
मुंबई, सोलापूर, पिंपरी चिंचवड यासह राज्यातील मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या महापालिका, जिल्हा परिषदांसह नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका आगामी वर्षात होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांना व विद्यमान आमदार, खासदारांच्या प्रतिष्ठेच्या या निवडणुका असणार आहेत.
या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबर 2021 मध्ये लागेल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, राज्यातील एकमेकांचे पारंपारिक विरोधक एकत्र येत भाजपला कधीही न वाटणारी महाविकास आघाडी स्थापन करून भाजपला सत्तेपासून बाजूला केले. त्यानंतर इतर राज्यातील अनुभव पाहता महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार, अशी सातत्याने चर्चा सुरु झाली. निवडणुकांमध्ये व निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता आहे की सर्वकाही ठिक सुरु आहे,
याचे चित्र स्पष्ट होईल, अशीही चर्चा आहे. त्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. मात्र, तिन्ही पक्ष एकत्रित लढल्यानंतर भाजपला त्याचा सर्वाधिक लाभ होईल म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढतील.
ग्रामपंचायत निवडणुकीतील अनुभवावरून तिन्ही पक्षांनी त्यादृष्टीने तयारी केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.