लोणी येथून राष्ट्रीय महामार्गाच्या विक्रमी बांधकाम कार्याला उत्साहात प्रारंभ

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राजपथ इन्फ्राकॉनचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड”चा प्रयत्न.

110 तास, “नॉन स्टॉप” चालणार बिटुमिनस काँक्रिट रस्ता बांधकाम कार्य.

अमरावती/अकोला

अमरावती ते अकोलादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर लोणी ते मूर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील, चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बिटुमिनस काँक्रिटीकरणासह सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीच्या कामाला आज सकाळी प्रारंभ झाला. महामार्गावरील लोणी येथे ६ वाजतापासून विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य प्रवर्तक राजीव अग्रवाल आणि राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी यंत्र सामग्रीची पूजा केली. दरम्यान, गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड्सचे समन्वयक मिलिंद वेर्लेकर यांनी अधिकृत घोषणा केल्यानंतर, सकाळी ७.२७ वाजतापासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात आली. सकाळी १०.३० वाजेपर्यंत ११८० रनिंग मीटर बिटुमिनस काँक्रिटचे काम करण्यात आले.

पुण्यातील पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रातील, सुप्रसिद्ध आणि दिग्गज राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. दमदार कामगिरीसाठी सर्वत्र ओळखली जाते.राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते अकोला जिल्हयातील चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने ३ जूनला सकाळी ६ वाजतापासून ते ७ जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या सर्वात लांब रस्त्याची अखंड निर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये होईल.

राजपथ इन्फ्राकॉनचा हा प्रयत्न गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होत आहे. तसेच NHAI (नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया) द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत सुरू आहे. त्यासाठी एकूण ७२८ मनुष्यबळ तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. या कामाची नोंद घेण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची संपूर्ण टीम दाखल झाली आहे.

राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी सांगितले की, मागील वर्षी जुलैमध्ये राष्ट्रीय महामार्ग कामाची संधी मिळाली. जवळपास ९- १० वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना वाहतुकीचा प्रचंड त्रास होत होता. या रस्त्याचे काम करताना, काहीतरी वेगळी कामगीरी करून दाखविण्यासाठी आम्ही संकल्प केला.यंदा देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली आहेत. यानिमित्त सारा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. म्हणून या कामाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी, अशी कामगिरी करता येईल का, याची चाचपणी केली. मागील चार महिन्यांपासून, गिनीज बुकसोबत संपर्क साधून उपक्रमाची माहिती दिली. यापूर्वी अशा प्रकारचा रेकॉर्ड कतार देशामध्ये दोहा येथे करण्यात आलेला आहे. हा विक्रम मोडून देशाला 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त, दोन लेनमध्ये,न थांबता, महामार्ग बांधकामाची अनोखी भेट देण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार कंपनीने सूक्ष्म नियोजन केले. आज त्यास प्रारंभ झाला . 7 जून रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सलग 110 तास काम करून विश्वविक्रम प्रस्थापित केला जाईल, असा विश्वास श्री. कदम यांनी व्यक्त केला. हा विक्रम राष्ट्राला समर्पित केला जाईल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य प्रवर्तक राजीव अग्रवाल यावेळी म्हणाले, अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. येत्या डिसेंबर 2022 पर्यंत 95 टक्के बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी कंपनीकडून अथक प्रयत्न केले जात आहेत. दोन लेनची रुंदी 9 मीटर राहणार असून, दोन्ही लेन मिळून विश्वविक्रमी रस्ता बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण केला जाईल, असेही ते म्हणाले.

आमदार प्रतापदादा अडसड यांची भेट
याप्रसंगी काम सुरू होताच धामणगाव मतदार संघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांनी लोणी येथील महामार्गावर भेट देऊन विश्वविक्रमी कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी यावेळी सदर महामार्ग कामाबद्दल आनंद व्यक्त केला आणि शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment