प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगनघाट :- यशवंत भारती लोककल्याण संस्था नागपूरच्या वतीने देण्यात येणारा ‘ विदर्भ भूषण ‘ पुरस्कारासाठी हिंगणघाट येथील वैज्ञानिक डॉ. उमेश वावरे यांची निवड करण्यात आली असता त्याना सामाजिक क्षेत्रात विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,
आज २७ डिसेंबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमातंर्गत जागतिक बँकेचे माजी सल्लागार तथा कृषी तज्ञ डॉ. रमेश ठाकरे , माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत , सामाजिक न्याय विभागाचे डॉ. सिद्धार्थ गायकवाड, साहित्यिक व लेखक डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. पी. शिवस्वरूप आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला,
अत्यंत गरीब कुटुंबातील डागा मिल मजदूराचा मुलगा असलेले डॉ. उमेश वावरे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन एकूण १७ देशात विज्ञान जगतात यशस्व
वैज्ञानिक म्हणून भारताचा झेंडा रोवला तसेच हिंगणघाटचे नाव चमकावले. डॉ. उमेश वावरे यांनी केलेल्या विज्ञान जगतात शोध कार्याबद्दल अमेरिका, साऊथ आफ्रिका, कतार ,मलेशिया यासह अनेक देशांनी त्यांना पदवी बहाल केली आहे. विज्ञान संशोधन क्षेत्रात काम करताना भारतातर्फे फ्रान्स, यु एस ए, साऊथ आफ्रिका, ब्राझील, कतार मलेशिया, इटली या देशांच्या संयुक्त वैज्ञानिक दलामध्ये डॉ. उमेश वावरे यांना सहभागी करण्यात आले होते. यामध्ये संशोधन कार्यात अकरा वर्ष सेवा दिली.
शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी डॉ. उमेश वावरे यांनी जवळून पाहिल्या. समाजातील उपेक्षित वंचित आम आदमीच्या कल्याणासाठी काहीतरी केले पाहिजे ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी निर्णय घेत मोठ्या पगाराची नोकरी सोडून हिंगणघाट येथे स्थानापन्न होऊन समाजसेवेचे कार्य हाती घेतले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन सदर संस्थेतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठित विदर्भ भूषण पुरस्कारासाठी डॉ. उमेश वावरे यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार सोहळा पार पडला.