आजारी वृध्द रुग्णांना युवक हाताची साखळी बनवून नदितून घरी पोहचवतात
बुलढाणा : महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावाला शहराशी जोडण्यासाठी रस्ते जोडणीचा दावा सरकारकडून केला जात आहे. मात्र असे असले तरीही शेगाव तालुक्यातील महागाव हे जवळा पळसखेड गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असून गेल्या कित्येक वर्षापासून ग्रामपंचायत अंतर्गत ठराव घेऊन विविध विकास कामांसाठी मागणी करण्यात येते मात्र याठिकाणी भेदभाव या भावनेतून या गावात रस्ते सेवांतर्गत सुविधा करण्यात आलेल्या नाहीत असा गावकर्यांकडून आरोप करण्यात येत असला तरीही या गावाची ही वास्तविकता नाकारता येत नाही.
महागांव बोर्डी नदीच्या काठावर वसलेले आहे. ४५० लोकसंख्येच्या गाव विकासासाठी सर्व धर्मीय एकत्र येऊन प्रयत्न करतात मात्र या ठिकाणी गावकऱ्यांकडून माहिती मिळाली आहे की आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो जसे की विद्युत पुरवठा,पिण्याचे पाणी यासाठी संघर्ष करावा लागला सहजतेने कोणत्याही गोष्टी या ठिकाणी मंजूर झालेल्या नाहीत.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी महागावला भेट दिली. त्यावेळी स्वतः त्यांनी बोर्डी नदीच्या पाण्यातूनच गावात प्रवेश केला यावेळी त्यांनी गावातील समस्या जाणून घेतल्या आणि गावकऱ्यांना बोर्डी नदीवर पूल बांधून देण्याचे आश्वासन दिल्या गेले असे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर गावकऱ्यांचा पाठपुरावा कमी पडला असावा किंवा कुठेतरी पाणी मुरले असावं अशी शंका गावकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे त्यामुळेच महागावच्या बोर्डी नदीवर पूल बांधण्यात आला नसावा.
या बोर्डी नदीतूनच महागाव येथील गावकऱ्यांना आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी ये-जा करावी लागते. पावसाळ्याच्या दिवसात या गावांमध्ये जर एखादा व्यक्ती मरण पावला आणि बोर्डी नदीला पूर जर असला तर तो मृतदेह पूर ओसरेपर्यंत दोन दिवस घरांमध्ये ठेवावा लागतो कारण मृतदेहाचे अंतिम संस्कार करण्याकरिता महागाव वासीयांना बोर्डी नदीच्या पलीकडून जवळा बुद्रुक येथील स्मशानभूमी येथे घेऊन जावे लागते. त्याच बरोबर दळण,किराणा,दवाखाना अशा विविध गोष्टींसाठी गावकर्यांना ही नदी ओलांडून बाजूच्या जवळा बुद्रुक या गावांमध्ये जावे लागते त्याचबरोबर एखाद्यावेळेस मुले ही जवळा बुद्रुक या गावी शाळेत असताना नदीला पूर आला तर मुले ही बोर्डी नदीच्या तिकडच्या काठावर अडकून असतात आणि मुलांचे आई वडील महागाव मध्ये अशा गंभीर परिस्थितीचा सामना या गावकऱ्यांना करावा लागत आहे.
गावकऱ्यांशी आणखी बाबी विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की आम्ही आमच्या मूलभूत गरजा साठी भांडत असताना कित्येक अधिकाऱ्यांना याबाबतीत माहिती सुद्धा नाही कि महागाव हे कुठे आहे असे आम्हाला विचारण्यात येते. महागाव वासियांची परिस्थिती आज रोजी आदिवासी लोकांपेक्षाही गंभीर अशी परिस्थिती बोर्डी नदीवर पूल नसल्यामुळे झालेली आहे. कारण या गावामध्ये लोकसेवक आतापर्यंत ही आलेले नाहीत जिल्हा परिषद सदस्य बुलढाणा लोकसभेचे खासदार प्रतापराव जाधव पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनासुद्धा महागाव कुठे आहे हे माहीत नसावे असे गावकरी सांगतात.
बोर्डी नदीवर पूल नसल्यामुळे या गावातील उमेश महादेव डाबेराव ३२ वर्षीय युवक हा आपल्या वैयक्तिक कामासाठी एक धान्याची गोणी डोक्यावर घेऊन नदीतून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता यावेळी त्याचा पाय घसरून तो गोणीसह पडला यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात सध्या मृत्यूशी झुंज देत आहे असे त्याच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले आहे.
ही सर्व घटना घडल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे कारण हा अपघात फक्त बोर्डी नदीवर पूल नसल्यामुळे घडला आहे जर या नदीवर पूल असता तर एखादं वाहन गावात येऊन तो युवक त्या वाहनात त्याची धान्याची गोणी घेऊन गेला असता. महागाव येथील नागरिक हे आजारी असताना त्यांना या नदीच्या पाण्यातून प्रवेश करावा लागतो वयोवृद्धांना या गावातील युवक साखळी बनवून हातावर उचलून नदीच्या त्या काठावरून ते महागाव पर्यंत घेऊन येतात अशी गंभीर परिस्थिती आज रोजीही महागांव येथे आहे.
बोर्डी नदीवर पूल बांधण्यात यावा या मागणीसाठी गावकरी संघटित होऊन लढा देणार असल्याचे पाहून विविध राजकीय संघटनाडून या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात येत आहे. महागाव येथील बोर्डी नदीवर पूल बांधण्यासाठी संबंधित प्रशासनाकडून समस्या सोडवण्यासाठी कोणतेही पावले उचलली गेली नाहीत तर गावकऱ्यांकडून रीतसर निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाची भूमिका गावकरी घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महागाव या गावासाठी बोर्डी नदीवर पूल बांधण्यात यावा याकरिता गावकरी आता सज्ज झाले असून वेळ पडल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन,उपोषण, आत्मदहनही करावे लागले तर मागे सरणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी ठाम केली आहे. येत्या निवडणूकीवर गावकरी वेळ पडल्यास बहिष्कार सुद्धा घालतील असे सुद्धा गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. आता लोकसेवक आणि प्रशासनाची भूमिका महागाव येथील बोर्डी नदीच्या पुला संबंधित कोणती असणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.