दगडू पिंगळे
निलंगा प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वच उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीत बाद केले होते. या विरोधात भाजपचे आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर व इतरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलेल्या आमदार धीरज देशमुख यांच्यासह अन्य बिनविरोध संचालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पंरतु या प्रकरणात संभाजी पाटील यांनी आता थेट मुख्यमंत्री कार्यालयावरच आरोप केला आहे.
जिल्हा बॅंकेतील उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असतांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करण्यात आला, संबंधित अधिकाऱ्यावर दबाव आणून भाजपसह इतर विरोधकांचे अर्ज बाद करण्यात आले, असा गंभीर आरोप संभाजीप पाटील निलंगेकर यांनी केला आहे. लातूर जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत शेतकरी, सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्यात तसेच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपसह सर्वच विरोधी उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद केले. आमदार धीरज देशमुख, राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांच्यासह पाच जणांनी आपण बिनविरोध निवडून आल्याचा दावा केला. उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सीएमओ आॅफीमधून फोन आला. विरोधकांचे अर्ज बाद करण्यासाठी दबाव टाकण्यात आला त्यानंतरच आमचे अर्ज बाद केले गेले, असा आरोप संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला.लोकशाहीचा खून करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, या मागणीसाठी आम्ही शेतकऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचेही संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले.