Home Breaking News एक दिवस अन्नदात्यासाठी- रविकांत तुपकर

एक दिवस अन्नदात्यासाठी- रविकांत तुपकर

306

 

माझ्या प्रिय, शहरवासियांनो,

मनापासून नमस्कार!
आता वेळ आली आहे आपल्या अन्नदात्याप्रति विचार करण्याची, कृतज्ञता व्यक्त करून कृतिशील पाठिंबा देण्याची. आपल्या ताटातील अन्नाचा कण अन् कण शेतकऱ्यांच्या घामाच्या थेंबातून तयार होतो. अजून तरी कारखान्यात अन्नधान्य निर्मितीची सोया झाली नाहीये. किसान आणि जवानाच्या जीवावर आपण जगतो. पण काबाडकष्ट करूनही आज शेतकऱ्याच्या वाट्याला आत्महत्या येत आहे. गेल्या नऊ महिन्यांत पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यातील ८०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अनेक शेतकऱ्यांच्या मुली बापावरील बोजा कमी करण्यासाठी पत्र लिहून आत्महत्या करत आहेत. त्यामुळे एक राष्ट्र म्हणून, समाज म्हणून आपण सपशेल अपयशी ठरत आहोत, ही भावना अपराधीपणाची आहे. निर्ढावलेल्या राज्यकर्त्यांना मात्र शेतकऱ्यांबद्दल काही वाटत नाही, ही शोकांतिका आहे.

सोयाबीनचे भाव आज ११००० वरून ४००० रुपयांवर आले आहेत. कापूस उध्वस्त झाला आहे. उत्पादन खर्च वाढलाय तर उत्पादन कमी झाले आहे. शेतकऱ्यांना पिकविमा मिळालेला नाही. त्यात रब्बीच्या हंगामात वीजेचे कनेक्शन कापण्याचा सपाटा सुरू झाला आहे. कर्जमाफीचे पैसे आजवर अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टाने पिकवलेले उभे पीक आडवे झाले. आपल्या जिल्ह्यात साठ ते सत्तर टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र नुकसानभरपाईचा अद्याप पत्ता नाही. कष्ट तर आपण सर्वच करत असतो मात्र त्यासाठी लागणारे बळ आपल्याला अन्नातून मिळते. हे अन्न आपल्या देशातील बळीराजा पोटाला चिमटा काढून पिकवतो, याची आपल्याला जाणीव असायला हवी. त्याच्या पोटाला अन्न मिळायचीच ददात आज निर्माण झाली आहे. ही नियतीची व त्याहून अधिक राज्यकर्त्यांची क्रूर चेष्टा आहे. अशावेळी आपण गप्प बसून चालेल का?

शहरात राहणाऱ्या माझ्या सुजाण, सुशिक्षित नागरिक, व्यापारी, साहित्यिक, विचारवंत, तरुण, तरुणी, उद्योजक बांधवांनी अन्नदात्याची संवेदना जाणली पाहिजे, त्यांच्या परिस्थितीबाबत चिंतन केले पाहिजे व त्यांच्या लढाईला बळ दिले पाहिजे. बळीराजाची फौज हक्काचे घामाचे दाम मागण्यासाठी रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजी ‘एल्गार’ पुकारणार आहे. हा मोर्चा दुपारी १२ वाजता बुलडाणा शहरातील जगदंबा माता मंदिर (मोठी देवी) चिखली रोड येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. शहरातील नागरिकांना माझे नम्र आवाहन आहे की, अन्नदात्या शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने या लढाईत सामील व्हा…! आपला पाठिंबा आमच्या जखमांवर फुंकर घालण्याचे व मनगटात बळ देण्याचे काम करेल. आपली भूक भागविणाऱ्या अन्नदात्यासाठी एवढे केलेच पाहिजे.

आपला नम्र – रविकांत तुपकर,बुलडाणा

Previous articleआर्यन खानला जेलमधुन बाहेर काढण्यासाठी शाहरुख ला मोजावे लागली तब्बल एवढी “रक्कम”
Next articleप्रसिद्ध विधीज्ञ उज्जवल निकम यांची डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालयाला सदिच्छा भेट