वन्य प्राण्यांमुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची, पशुधनाची तसेच मनुष्यहानी होऊन झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली होती. यासाठी त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता दरम्यान त्यांनी केलेला पाठपुरावा आणि आंदोलनाचा दणका पाहता बुलडाणा जिल्ह्याला वनप्राण्यांनी केलेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी ३ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात वन्यप्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते, काही ठिकाणी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी, शेतमजूर गंभीर जखमी होतात तर काही ठिकाणी मनुष्यहानी देखील होते. शिवाय वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधन दगावल्याच्याही मोठ्या घटना आहेत. सदरची नुकसानभरपाई एका महिन्यात देणे बंधनकारक असते परंतु जिल्ह्यातील सन २०१९ – २० आणि २०२० – २१ या दोन वर्षांमधील नुकसानभरपाईचे सर्व प्रकरणे प्रलंबित होते. सदर झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आलेले होते परंतु शासनाकडून मदत देण्यात आली नव्हती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या पाठपुराव्यामुळे सदर नुकसान भरपाइची रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली असून गेल्या दोन वर्षांपासून मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.