(हिंगणघाट)
एके काळी वणा नदीचे पात्र स्वच्छ आणि सुंदर असायचे. नदीचा प्रवाह अंखडीत वाहत राहायचा.पाणी स्वच्छ ,निळसर आणि काळेभोर असायचे.नदी पात्रात भरपूर वाळू असायची. त्यामुळे शहरातील आणि परिसरातील अनेक लोक आनंद घेण्यासाठी नदीच्या सहवासात यायची.नदी पात्रात बसून मित्र मंडळीसह , कुटुंबासह भोजन करायची आणि नदीच स्वच्छ ,निर्मळ असं पाणी प्राशन करून नदी सहवासतल्या आठवणी आपल्या मनात साठवून मोठ्या आनंदाने घरी परतायची .पण आज परिस्थिती बदललेली आहे. गाव शहरातून येणारे दुषीत पाणी,त्यात येणारा कचरा,कारखाण्यातून येणारे रसायनमिश्रीत पाणी ,रेती माफीयांकडून नदी पात्रात झालेले खड्डे यामुळे हिंगणघाट तालुक्याची जीवनदायीनी असलेली वणा नदीचे स्वास्थ धोक्यात आलेले आहे.या वणा नदीच्या पाण्याच्या भरोश्यावर आपण लहानाचे मोठे झालो आहे. इथले उद्योजक मोठे झाले आहेत, श्रीमंत झाले आहेत. वणा नदीचे आपणावर एवढे मोठे उपकार आहेत.एखाद्याने आपल्यावर उपकार केले तर आपण त्याच्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो .पण आपल्यावर उपकार करणारी ही जीवनदायीनी आज संकटात असतांना जीच्या पाण्यावर जी मंडळी श्रीमंत झाली त्या मंडळीने मात्र नदीचे स्वास्थ ठिक करण्याकरीता पाठ फिरवीली आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेनी,विद्यार्थ्यांनी ,युवकांनी पुढाकार घेऊन वणा नदीच्या संवर्धन आणि सौंदर्यीकरणासाठी पुढाकार घ्यावा ; नाही तर भविष्यात आपणाला फार मोठी किंमत मोजावी लागेल असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि निसर्ग मित्र हौशी सायकल क्लबचे संस्थापक अनिल जवादे यांनी व्यक्त केले. वणा नदी तीरावर चला वणा नदीचे संवर्धन आणि सौंदर्यीकरण करु या या निसर्ग मित्र हौशी सायकल क्लब द्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.वणा नदी संवर्धन समितीचे रूपेश लाजूरकर,मच्छिमार संघटनेचे अशोक मोरे यांचीही समायोचीत भाषणे झाली.प्रारंभी निसर्ग मित्रच्या सर्व सदस्यांनी नदी पात्राची स्वच्छता केली. या उपक्रमात शहरातील काही समाजसेवी संघटनांच्या प्रतीनिधीसह डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थीही समाविष्ट झाली होती.
..