Home Breaking News एकदा ‘सह्याद्री’ कृषी पर्यटन केंद्रावर याच..! – नंदकुमार पालवे

एकदा ‘सह्याद्री’ कृषी पर्यटन केंद्रावर याच..! – नंदकुमार पालवे

384

 

 

मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण

खामगाव – उंद्री – जालना रोड तसा गजबजलेला रोड. नियमित वाहनांची ये-जा… सर्वांचं आयुष्य गाडीच्या चाकांना गुंढाळलेलं.. जस जसे गाडीचे चाकं फिरतात तस तसं आयुष्यही पुढे सरकतं.. बालपण, शिक्षण, विविध ट्यूशन, classes, त्यानंतर नोकरी, घर, यामध्ये संपत आलेलं तारुण्य व सुरू झालेलं प्रौढत्व असंच पुढे सरकत जातं.. प्रौढत्व ही संपून मग उतारवय सुरू होतं आणि सुरू होतो खरा प्रवास.. जीवनाच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावतांना उतारवयात लक्षात येतं की आपलं तर जगायचंच राहून गेलं..
आपण सर्व सुखाच्या मागे धावत सुटलो पण ते ही आपल्यापासून दूर जात राहिलं, ‘शेतकरी शहाणा होतो दिवाळीला’ तसंच माणूस शहाणा होतो उतारवयात..
हे सर्व व्याप विसरून जर तुम्हाला जगायचं आनंद घ्यायचा असेल तर आमच्या अमोल भाऊ साठे व पवन भाऊ साठे यांनी रक्ताचं पाणी करून निर्माण केलेल्या ‘सह्याद्री’ वर अर्थात ‘ सह्याद्री कृषी पर्यटन’ केंद्रावर नक्की या..
सह्याद्री वर पोचले की सर्वात प्रथम तुमची नजर पडते शिवरायांच्या भल्यामोठ्या मूर्ती वर..मराठी मनाचा केंद्रबिंदू छत्रपती शिवराय व संबंधित ढाल तलवारी, भाले पाहून तुम्हाला जाणीव होते या केंद्राचं ‘सह्याद्री’ नाव किती सार्थ आहे..
इथे उंच झोक्यांवर झुलतांना तुमच्या बालपणीचा पिंपळाच्या झाडाला टांगलेला नागपंचमीचा झोका तुम्हाला आठवेल, त्याचा आनंद तुम्हाला कुठल्याच बंगाईत मिळणार नाही.. शेकोटीच्या अवतीभोवती शेकता शेकता चहा घेतांना तुम्हाला तुमचे पारावर गप्पांची मैफिल भरवणारे मित्र भेटतील, ओढे नाल्यांवर तुम्ही व मित्र परिवाराने बालपणी केलेल्या दंग्यांचा अनुभव तुमच्या मुला मुलींना तुम्हाला सह्याद्री वर देता येईल.. ससे व कुत्र्यांचा तंदुरुस्त पिल्ल्यांसोबत तुमचे बच्चे कंपनी भूक विसरून जातील.. अलगद एखादा कबुतर किंवा मोर तुमच्या खांद्यावर येऊन बसेल तेव्हा तुम्हाला आपण प्रेमळ माणूस असल्याचं प्रमाणपत्र आपसूक मिळेल ( पशु पक्षी प्रेमळ माणसांजवळच येतात असं म्हणतात.
या वैरागड च्या माळरानावर बॉटल पाम, नारळी सारखे उंच झाले डौलाने डोलत आहेत, ठिकठिकाणी कमळ फुललेले आहेत, माझ्यासारखा 100 किलो चा माणूस झोपू शकेल अश्या भल्यामोठ्या ब्रम्हराक्षसाच्या पानाला पाहून त्याच्या सोबत सेल्फी घेण्याची मोह एखादा इंद्रजित च आवरू शकेल. विविध वेस्ट वस्तूंपासून बनवलेल्या बेस्ट वस्तू तुमचं लक्ष वेधून घेतात.. छोटा झुलता पूल, बांधातून तयार झालेला सुरेख धबधबा, आजूबाजूला उंचच उंच डोंगर, सगळंच अप्रतिम…
बांबू च्या कलाकुसरीने बनलेल्या अनेक वस्तू साठे बंधुद्वयाचं कलाप्रेमी तुम्हाला दिसेल.. याठिकाणी एक ही वस्तू इथे वाया जाऊ देत नाही. लोप पावत चाललेली दमनी, बैलगाडी मनाला अनामिक आनंद देऊन जातात.
ज्यांना मराठी संस्कृती, गड किल्ले व शिवरायांच्या रुची आहे त्यांनी अमोल भाऊ च्या आईंना जरूर भेटावं. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला त्या आवर्जून भेटतात आणि मग ते पाहुणे ‘पाहुणे’ राहत नाहीत तर सौभाग्यवती गिताआजी जगन्नाथ साठे यांच्या भल्यामोठ्या परिवाराचा, सह्याद्री परिवाराचा घटक होतात. गिता आजीचं वय आज केवळ 71 वर्ष.. ‘केवळ 71 वर्ष’ का म्हणतोय याचा प्रत्यय तुम्हाला त्यांना भेटल्यावर येईल. मागच्या वर्षी आजी रायगडावर जाऊन आल्या.. अंगभरून नेसलेलं नऊवारी पातळ, कपाळावर लखलखनारं कुंकू, गोऱ्यापान चेहऱ्यावरील स्मितहास्याला कष्टातून आलेली तेजाची लकेर, करारी डोळे, अस्सल मराठी पोशाखात वावरणाऱ्या आजी जेव्हा समोर येतात तेव्हा आपसूक आपले हात त्यांच्या पायाकडे झुकतात. “पोरांनो आता जेवण केल्या शिवाय जाऊ नका” म्हणताना त्यांच्या डोळ्यातील माया आपल्याला दिसते.
शिवरायांचा इतिहास सांगतांना त्यांचं अफाट वाचन , दांडगा शब्दसंग्रह, त्या शब्दांचा लीलया वापर व छत्रपतींच्या केवळ नावामुळे त्या माऊलीच्या डोळ्यात आलेला अभिमान, स्वाभिमान आपल्याला त्यांच्या शब्दा शब्दांत दिसतो.
सह्याद्री कृषी पर्यटन नवीन आहे, अनेक गोष्टी बनवायच्या बाकी आहेत, कुठलंही शासकीय अनुदान नाही, केवळ आपल्या सारख्या माणसांच्या भेटींवर हा शिवधनुष्य साठे बंधू पेलत आहेत. आपण या, पहा आणि आपल्या अनुभवाच्या शिदोरी तुन ‘सह्याद्री कृषी पर्यटन’ अधिक सुंदर करायला मदत करा.. मराठी माणसाने चालू केलेल्या ह्या पर्यटन केंद्राला आपण जाऊन नक्की त्यांचा उत्साह वाढवावा. अस्सल मराठी जेवणाचा आस्वाद घ्यावा..
आपल्या परिवारातील जन्मदिवस, लग्नाचे वाढदिवस किंवा इतर मंगल प्रसंग याठिकाणी सेलिब्रेट करावे.. मी ग्वाही देतो सह्याद्री वरील एक दिवस आपल्या कायम लक्षात राहील.

एक उनाड दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, तो फक्त जगता आला पाहिजे, शोधता आला पाहिजे.. ,
जर तुम्हाला सापडत नसेल तो उनाड दिवस तर मी त्याचा पत्ता तुम्हाला देतो, एक दिवस सहज जाऊन पहा, बघा तुम्हाला तुमचा ‘एक उनाड दिवस’ सापडतो का?
पत्ता लिहून घ्या !
सह्याद्री कृषी पर्यटन,
वैरागड, ता. चिखली जि. बुलडाणा
खामगाव जालना मार्गावर, उंद्री च्या जवळ..
संपर्क :अमोलभाऊ साठे: 9850368705, 9373007144
पवनभाऊ साठे : 9851166935

नंदकुमार पालवे

Previous articleकोनसरी केंद्राची केंद्रस्तरीय “शिक्षण परीषद” कढोली येथे संपन्न.
Next articleजनाधार फाउंडेशन ” दिनदर्शिका 2022″ चे थाटात प्रकाशन सोहळा