शेगाव : दोन भरधाव येणाऱ्या मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण जखमी झाल्याची घटना नगरपरिषद शाळा क्रमांक ५ जवळ शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान घडली.
या घटनेनंतर शनिवार दिनांक १ जानेवारी रोजी दोन गटांमध्ये बाचाबाची होऊन काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आबीद शहा इस्माईल शहा वय २८ वर्ष याने शहर पोलीस स्टेशनला शनिवार दिनांक १ जानेवारी रोजी रात्री अडीच वाजता तक्रार दिली की, त्याची मोटरसायकल क्रमांक एम. एच २७ ए. एम २५६६ या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने तो बसस्थानकाकडून एम. एस. ई. बी चौकाकडे जात होता. यावेळी समोरुन विना नंबर प्लेट पल्सर मोटरसायकल भरधाव वेगाने येऊन समोरुन जोरदार धडक दिली. यामुळे मला मार लागून मी रस्त्याच्या बाजूला पडलो. या घटनेमध्ये माझ्या मोटरसायकलचे सुद्धा नुकसान झाले. मी रिजवान नावाच्या माझ्या भावाला घटनास्थळी बोलावले असता राज, राहुल, जतिन आणि शुभम अशा चौघांनी शिवीगाळ करून चाप्टा बुक्क्यांनी मारहाण केली. अशा तक्रारीवरून शहर पोलिसांनी कलम २७९, ३३७, २९४, ४२७, ३२३, ३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. दोन विभिन्न गटात झालेल्या वादामुळे शहरात काही काळ विविध अफवांना उधाण आलेले दिसत होते. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गौतम इंगळे हे करीत आहेत.