उषा पानसरे( कार्यकारी संपादिका) विकी वानखड़े (कार्यकारी संपादक)
बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणीच जेवणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली मध्यान्य भोजन योजना कामगारांना निश्चितच मदतनीस ठरणार, असा विश्वास कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज व्यक्त केला.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी अटल आहार योजनेंतर्गत मध्यान्य भोजन योजना राबविण्यात येते. अचलपूर उपविभागीय अधिकारी प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मध्यान्य भोजन योजनेचा शुभारंभ राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. अचलपूर उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसिलदार मदन जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अभयकुमार बारब्दे, सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे आदी यावेळी उपस्थित होते.
मजूरांना पूर्ण व सकस अन्न उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून श्री. कडू म्हणाले की, बांधकाम क्षेत्रातील मजूर रोजगारासाठी इतर जिल्ह्यात येतात. कामानिमित्त मजूरांचे स्थलांतरण मोठ्या प्रमाणावर होते. कामाच्या अनिश्चिततेचा परीणाम त्यांच्या जेवणावर होतो. याचा परीणाम कामगारांच्या शारिरिक क्षमतेवर होतो. यासाठी कामगारांना रोज सकस आहार मिळावा, यासाठी ही योजना राबविण्यात येते. कोरोना काळ असल्यामुळे सध्या मध्यान्य भोजन योजनेत कामगारांना मोफत भोजन देण्यात येत आहे. नोंदणीकृत मजूरांची संख्या लक्षात घेऊन भोजनाची व्यवस्था करण्यात येते. परंतु नोंदणी अभावी एकही बांधकाम कामगार उपाशी राहू नये, याची दक्षता संबधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. नोंदणी न झालेल्या बांधकाम कामगारांची त्वरित नोंदणी करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
मध्यान्य भोजन योजनेमध्ये कामगारांना एका वेळच्या भोजनात बाराशे कॅलरीज मिळतील एवढा आहार देण्यात येतो. या आहारात पोळी, दोन भाज्या, डाळ, भात व इतर आहाराचा समावेश आहे. या योजनेमुळे कामगारांच्या स्थलांतरावर आळा बसून कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे. परतवाडा येथे प्रथमच कामागारांसाठी मध्यान्य भोजन योजना सुरु होत असल्याबद्दल राज्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
मध्यान्य भोजन योजना सध्या अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरु राहील. गरजेप्रमाणे प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी जाऊन मजूरांना भोजन उपलब्ध करुन दिले जाईल, अशी माहिती राहुल काळे यांनी यावेळी दिली.
जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाला लवकरच नवीन इमारत
जिल्हा व अप्पर जिल्हा सत्र न्यायालयातील वकील संघामार्फत राज्यमंत्री श्री. कडू यांचा सत्कार करण्यात आला. वकील संघासाठी नवीन इमारत बांधकामाचा प्रश्न त्वरित मार्गी लागण्यासाठी संघामार्फत त्यांना निवेदन सादर करण्यात आले. न्यायालयीन कामांना वेग येऊन प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा व्हावा, यासाठी न्याय व्यवस्था महत्त्वपूर्ण आहे. न्यायदानाची इमारत सर्व सोयींनी सुसज्ज असावी. विधीज्ञांना बसण्यासाठी उत्तम आसन व्यवस्था, प्रशासकीय कामकाजासाठी स्वतंत्र कक्षांचा त्यात समावेश करण्यात येईल. तसेच आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येऊन न्यायालय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येईल, असे आश्वासन श्री. कडू यांनी यावेळी दिले. वरिष्ठ विधिज्ञ ॲङ सुरेश गुलक्षे, संघाचे अध्यक्ष ॲङ विजय गोडबोले, उपाध्यक्ष ॲङ. मोहम्मद सलिम, सचिव ॲङ आशिष अग्रवाल तसेच विधिज्ञ यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संतोष हिवराळे तर आभार श्री. सलिम यांनी मानले.
श्री सिध्दीक्षेत्र वाघामाता उद्यान परीसरातील रस्ते बांधकामाचा शुभारंभ
परतवाडा येथील श्री सिध्दीक्षेत्र वाघामाता उद्यान परिसरात रस्ते बांधकाम, सौंदर्यीकरण आणि विद्युतीकरण कामाचे उद्घाटन राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते करण्यात आले. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत हे विकास काम करण्यात येणार असून यासाठी 51 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. श्री सिध्दीक्षेत्र वाघामाता संस्थानामार्फत श्री. कडू यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मिश्रा चौक येथील गणपती सभागृह बांधकाम, टिळक चौकाचे डांबरीकरण, आठवडी बाजार ते पोलीस स्टेशन रोड डांबरीकरण तसेच शहरातील विविध रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचे उद्घाटन व लोकार्पण राज्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
Bacchu Kadu