अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)
प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन करणार
मुंबई, दि 10 ऑक्टोबर 2021
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी ११ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसेच काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारच्या बंदमध्ये सर्वशक्तीनिशी उतरून बंद यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले(nana patole) यांनी केले आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (ajay mishra)यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून त्यांची हत्या केली. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारची भूमिका अत्यंत बेजबाबदार राहिली आहे. उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था नसून रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरु आहे. निष्पाप लोकांना दिवसाढवळ्या गाडीखाली चिरडून मारले जात आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी(priynka gandhi) यांनी या नरसंहारचा निषेध करत शेतकऱ्यांना भेटण्यास जात असताना त्यांना अडवण्यात आले. त्यांना बेकायदेशीर ताब्यात ठेवले न नंतर अटक केले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल(bhupesh baghel) यांनाही शेतकऱ्यांना भेटण्यास जाऊ दिले नाही. काँग्रेसच्या खासदाराला पोलिसांनी धक्काबुक्की केली. लखीमपूर खेरी प्रकरणात उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारने लोकशाही व संविधानाचा गळा घोटला आहे.
भारतीय जनता पक्ष हा शेतकरी विरोधी पक्ष असून शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या भाजपा विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी व लखीमपूर खेरी येथील पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीने हा बंद पुकारला आहे. शेतकरी जगला तरच हा देश जगेल त्यामुळे राज्यातील जनतेने व व्यापा-यांनीही अन्नदाता बळीराजाच्या हक्कासाठी उस्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले आहे.
Surya marathi news






