मार्मिक साप्ताहिकाच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी ६ दशकांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचं मार्मिक हे साप्ताहिक अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरायचं. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर देखील मार्मिकनं आपलं काम तसंच कायम ठेवलं असून त्याच मार्मिकचा आज वर्धापन दिन सोहळा पार पडला. करोना काळात निर्बंध आणि सतर्कता म्हणून हा सोहळा ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आला. या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाही झाले होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मार्मिकविषयी आणि खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
मार्मिकचं प्रारंभीचं स्वरूप विरंगुळ्याचं!
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मार्मिक साप्ताहिकाचं सुरुवातीचं स्वरुप विरंगुळ्याचं होतं असं सांगितलं. “सतत लढा सुरू असताना मराठी माणसाच्या आयुष्यात थोडा विरंगुळ्याचा क्षण आला पाहिजे. दुर्घटना असली, की मोठी हेडलाईन असते. वाईट घटनांची बातमी मोठी असते. तेच तेच बघून त्यातून चेतना कशी मिळणार? त्या एका विचारातून मार्मिकचा जन्म झाला. सुरुवातीला मनोरंजन करणं असं त्याचं स्वरूप नक्कीच होतं. पण मराठी माणसाच्या घरामध्ये त्याच्या हक्कांवर परप्रांतीय आक्रमण करत आहेत. मग त्या मनोरंजनाची जागा मनोव्यथा व्यक्त करणारी, अन्यायावर धारदार वार करणारी झाली. त्यातून एक चळवळ आणि पुढे संघटना निर्माण झाली. तिचं नाव शिवसेना”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“त्या वेळीही स्वत:चं व्यंगचित्र साप्ताहिक सुरू करणं हा धाडसी विचार होता. कशामुळे मार्मिकची कल्पना आली? संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आमचे काका व्यंगचित्र काढायचे. मावळा या नावाने ते व्यंगचित्र काढायचे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबई घेऊन महाराष्ट्रानं यशस्वी केला. त्यालाही आता ६१ वर्ष झाली”, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
आणीबाणीत मार्मिकवर होती बंधनं!
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी आणीबाणीच्या वेळी मार्मिकवर असलेल्या बंधनांविषयी देखील आठवण सांगितली.आणीबाणीच्या वेळी विचित्र असं बंधन मार्मिकवर होतं. मार्मिकवर बंदी नव्हती, पण मार्मिकच्या प्रेसला टाळं होतं. म्हणजे घराला कुलूप आणि बाहेर जाऊन जेवायचं. दहशतीखाली कुणी मार्मिक छापायला तयार नव्हतं, कुणी वितरक मार्मिक बाजारात आणायला तयार नसायचं. तेव्हा दिवाकर रावते अक्षरश: हातगाडीवरून मार्मिक बाजारात घेऊन जायचे. त्याच मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेनेसाठी सामनाला जन्म घ्यावा लागला”, असं शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले . ✍️ मोहन चौकेकर