173 कोटीचा घोटाळा असल्याचा
जितेंद्र एन. जैन यांचा आरोप
अजहर शाह
बुलढाणा:-मृद व जलसंधारण विभागाने सन 2020 – 2021 या आर्थिक वर्षात काढलेली 173 कोटींची निविदा शासनाच्या धोरणाशी पूर्णपणे विसंगत आहे.मोठ्या कंत्राटदारांना हाताशी धरुन मलिदा लाटण्यासाठी या विभागातील अधिकारी वर्गाने शासनाच्या परिपत्रकाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून शासनाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान केले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा नेते जितेंद्र एन. जैन यांनी केला आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या निविदेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जैन यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, मृद व जलसंधारण विभागाने 149 कामांना एकत्रित करुन केवळ 25 कामांची 173 कोटी रुपयांची निविदा काढली. लहान कंत्राटदाराना सदर कामे मिळू नये यासाठी या विभागाने वेगवेगळ्या गावातील व तालुक्यातील कामे एकत्र करून एकच मोठ्या रकमेची निविदा काढली आहे. केवळ मॅनेज केलेल्या मोठ्या कंत्राटदाराना काम मिळावे यासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्यांने ही चुकीची प्रक्रीया शासनाची फसवणूक करून राबवली असल्याचा आरोप निवेदनकर्ते जितेंद्र एन. जैन यांनी केला आहे. लहान लहान, वेगळीवेगळी तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता व वित्तीय मान्यता घेऊन कामे काढली असती तर शेकडो कंत्राटदारांना रोजगार मिळाला असता.. परंतु शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांने सर्वांना मूर्ख बनवण्याचा प्रकार केला असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कोरोना आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे शासकीय निधी अभावी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व विभागाची कामे कमी करण्यात आली आहेत..कित्येक जिल्ह्यात निधीअभावी निविदा सूचना प्रकाशित न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. परंतु बुलढाणा जिल्ह्यात मात्र कोट्यवधी रुपयांच्या निविदा सूचना काढून मलिदा लाटण्याचा प्रकार केला जात असल्याचा गंभीर आरोप जैन यांनी केला आहे. आजरोजी सगळीकडे बुलढाणा जिल्ह्यात व महाराष्ट्रात सर्व विभागाची कामे10 ते 35 टक्के कमी दराने कंत्राटदार निविदा भरत असताना या निविदा एवढ्या उच्च दरात कशा आल्या असा सवालही जैन यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सदर 173 कोटींची निविदा प्रक्रिया व इतर निविदा प्रक्रियांची सखोल चौकशी करण्यात यावी, सदर प्रकरण 100 कोटीच्या वरचे असल्याने सी बी आय, एन आय किंवा ईडी मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, या निविदा प्रक्रियेच्या काळात ज्या कंत्राटदारांनी या निविदा भरल्या, कामे घेतली त्या कंत्राटदारांचे कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांचे, अधीक्षक अभियंता अमरावती, मुख्य अभियंता नागपूर तसेच मंत्रालयीन कर्मचारी व मंत्री यांच्यासह त्यांच्या सर्व स्विय सहाय्यक यांच्या मोबाईल चे सी डी आर व्हाट्सअप मेसेज ची चौकशी करण्यात यावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व कामे स्थगित करण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा नेते जितेंद्र जैन यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.
*चौकशी न झाल्यास E D कडे स्वतः तक्रार करणार- जितेंद्र एन. जैन*
कोरोना संसर्ग आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदी मुळे सामान्य माणसासह सरकारही हतबल झाले असतांना मृद व जलसंधारण विभागात कोट्यवधीच्या शासकीय निधीचा चुकीच्या पद्धतीने अपव्यय केला जातोय. लहान कंत्राटदारांना कामापासून वंचित ठेवून केवळ काही विशिष्ट कंत्राटदारांना फायदा मिळवून देऊन स्वतःचे खिसे भरण्यासाठी मृद व जलसंधारण
विभागातील अधिकारी वर्ग चुकीच्या पद्धतीने काम करतोय.. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे तशी मागणी केली आहे.. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, मृद व जलसंधारण मंत्री यांनाही सदर निवेदन/ तक्रार पाठवली आहे. सदर प्रकरणाची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकारकडून चौकशी लावली गेली नाही तर आपण स्वतः ईडी कडे तक्रार करणार असल्याचे जितेंद्र एन जैन यांनी म्हटले आहे.