शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन, अधिकाऱ्यांची भंबेरी, एकास अटक..! –मोहन चौकेकर

0
382

 

 

मंत्रालयातील दूरध्वनी बुधवारी (ता.11) रात्री खणाणला. समोरुन साक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज ऐकू येत होता. “हॅलो, सिल्व्हर ओकवरुन शरद पवार बोलतोय.. चाकणमधील जमीन प्रकरण मिटवा..” असे फोनवर सांगण्यात आले. हुबेहुब शरद पवार यांचाच आवाज असल्याने अधिकारीही काही क्षण गोंधळले.

मात्र, मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या काॅलची शहानिशा करण्यासाठी थेट ‘सिल्व्हर ओक’वरच कॉल केला नि सगळा प्रकार समोर आला. कोणीतरी पवार यांच्या नावाने फेक कॉल केल्याचे स्पष्ट झाले. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गावदेवी पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हे प्रकरण गंभीर असल्याने ते गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे.

पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने पुण्यातील जेऊर येथून एकाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेली व्यक्ती कोण आहे, त्याने कुणासाठी पवारांच्या आवाजात थेट मंत्रालयात कॉल केला होता, यासंदर्भात काहीही बोलण्यास पोलिसांनी नकार दिला.

दरम्यान, शरद पवार यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे मंत्रालयात त्यांच्या नावे फोन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनीही या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ✍️ मोहन चौकेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here