इंग्रजी भाषा शिक्षण व संवादशास्त्रातील योगदानाची दखल; नवी दिल्लीतील दीक्षांत समारंभात बहुमान
मूर्तिजापूर : मूर्तिजापूरसह संपूर्ण अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद कामगिरी समोर आली आहे. शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करत हजारो विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा अध्यापन व संवादकौशल्याचे मार्गदर्शन करणारे आखरे अँड मंडलापूर करिअर फाउंडेशन (AMCF) चे संचालक प्रा. सागर सुखदेवराव आखरे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा बहुमान प्राप्त झाला आहे.
अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथील इंटरनॅशनल अमेरिकन युनिव्हर्सिटी (IAU) कडून प्रा. सागर आखरे यांना “Doctor of Philosophy in English Language Education and Communication Sciences (Honoris Causa)” ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. नवी दिल्ली येथे आयोजित दीक्षांत समारंभात त्यांना हा सन्मान अधिकृतपणे प्रदान करण्यात आला.
प्रा. आखरे यांच्या प्रदीर्घ अध्यापन कार्याची, शैक्षणिक नेतृत्वाची तसेच इंग्रजी भाषा शिक्षण आणि संवादकौशल्य विकासातील योगदानाची दखल घेत विद्यापीठाच्या निवड समितीने त्यांची या सन्मानासाठी निवड केली.
विशेष म्हणजे, English Language Education and Communication Sciences या विशिष्ट क्षेत्रातील योगदानाबद्दल इंटरनॅशनल अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट मिळविणारे प्रा. सागर सुखदेवराव आखरे हे महाराष्ट्रातील एकमेव मानकरी ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि प्रभावी संवादकौशल्याची दिशा देण्याचे कार्य प्रा. आखरे सातत्याने करत आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे मूर्तिजापूरच्या शैक्षणिक क्षेत्राची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल मूर्तिजापूर शहरासह अकोला जिल्हा आणि महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतून प्रा. सागर आखरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.






