सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक संस्कृती लक्षात घेऊन दहिसरचा विकास हेच ध्येय,चारशे वर्षे पुरातन विहिर झाली पुनर्जीवित !!

0
239

 

सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक व धार्मिक संस्कृती लक्षात घेऊन दहिसरचा विकास हेच आपले ध्येय असल्याची माहिती शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली. दहिसर पश्चिमेकडील आय.सी. कॉलनी येथे चारशे वर्षांपूर्वीची दगडी बांधणीची आखीव-रेखीव पुरातन विहीर पूर्णतः बुझून गेली होती. तिच्यावर फुटपाथ बनविण्यात आले होते.या पुरातन विहिरीचा लोकार्पण सोहळा काल मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बोलतांना घोसाळकर यांनी आज आपणांस गावाची आठवण आल्याचे सांगत या उपक्रमाबद्दल शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचे कौतुक केले. यावेळी ईस्ट इंडियन समाजाच्या नागरिकांनी वाजत-गाजत पारंपारिक पद्धतीने या विहिरीची पूजा केली. स्थानिक शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी या विहिरीचे पुनरुज्जीवन केले आहे. आय. सी.चर्चचे रेव्ह फादर हॅरी वाझ यांच्या हस्ते या विहिरीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना फादर वाझ यांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेता करण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई होत असतांना आपल्या प्रभागातील हा प्रयोग आदर्श ठरणार असल्याचे तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितले. तर ह्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने आपला वाढदिवस साजरा करण्यात आल्याने त्यांनी सर्व नागरिक व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. चारशे वर्षांपूर्वी इस्ट इंडियन नागरिक विवाह सोहळ्यासाठी उंबराचं पाणी या विधीसाठी तिचा वापर करीत असत.या सोहळ्यात विहीरीची पूजा करून तेथे पापड भाजून त्याचा प्रसाद सर्वांना वाटत असत व विहीरीचे पाणी घरी नेऊन आंघोळ करीत असत. कालांतराने मुंबापुरीत नळ आल्यावर विहिरींचे महत्व कमी होत गेले अशी माहिती या उपक्रमाचे शिल्पकार, मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांनी प्रास्ताविक भाषणात दिली. ही पुरातन विहीर दुर्लक्षित होऊन बुझली. तिच्यावर पालिकेचे गटारही आल्याने त्याचे पाणी विहिरीत गडप होऊ लागले होते. दरम्यान गटाराचे पाणी जाते कोठे याचा शोध घेतला असता ही पुरातन बारा फूट लांब रुंद विहीर आढळून आली. तिच्या दगडी भिंती, पायऱ्या या सर्व जुन्या गोष्टी सुस्थितीत असल्याचे आढळले. त्यामुळे या विहिरीच्या पुनरुज्जीवनाचा आगळावेगळा प्रयोग करायचे ठरवले, असेही अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले. त्यासाठी तिच्यावरील गटार वळवण्यात आले. नागरीकरणाच्या रेट्यात शेजारच्या जमिनीची उंची वाढल्याने ही विहीर दोन फूट खाली गेली होती.त् यामुळे तिला दगडी लुकचा व्यवस्थित कठडा तसेच सुरक्षेसाठी शीट-जाळी लावण्यात आली आहे. या कामास विंसी परेरा यांनी पाठपुरावा केल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. आता याठिकाणी खराखुरा रहाट बांधण्यात आला असून प्रकाशझोत सोडण्यात आले आहेत.

नागरिकांमध्ये पाण्याचे महत्त्व लक्षात घेता जनजागृती व्हावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला याची माहिती घोसाळकर यांनी दिली. या परिसराचे सौंदर्यीकरण व्हावे यासाठी तेथे भित्तीचित्र तसेच पाषणशिल्पेही उभारण्यात आली आहेत. पुरातन इस्ट इंडियन रहिवासी उंबराचं पाणी घेऊन विवाहविधी करीत असल्याचे शिल्प येथे लावण्यात आले आहे. आता विहीर पुन्हा सज्ज झाल्याचे पाहून येथे पुन्हा विवाहसोहळ्यातील उंबरा -विधीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. याप्रसंगी विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, नगरसेविका माधुरी भोईर, अलबर्ट डिसूज़ा मैनेजिंग डायरेक्टर सेट. जॉर्ज कॉलेज, इग्नेशियस डिसूजा प्रेसिडेंट ईस्ट इंडियन असोसिएशन, लुइस रोड्रिक्स सेक्रेटरी ईस्ट इंडिया असोसिएशन स्थानिक नागररिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी स्टार व क्रॅब स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here