सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा
उमरगा : रविवारी उमरगा शहर बायपास जवळच्या कोरेगाववाडी रस्त्यानजीक एका ३५ वर्षीय युवकाचा डोळ्यात मिरची पावडर टाकून दगडाने ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणी अवघ्या १२ तासात उमरगा पोलिसांनी खून करणा-या दोन आरोपींचा शोध लावला. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत शाहूराज महादू सूर्यवंशी वय ३५ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
रविवारी सकाळी कोरेगाववाडी रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसून आल्याने, नागरिकांनी पोलिसांना कळविले.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन पुज्जरवाड, पोलिस कर्मचारी हजर झाले. पण मृतदेहचा चेहरा विद्रुप केल्याने ओळख पटत नव्हती. उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार व पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी आपले कौशल्य पणाला लावत मयताची ओळख पटविण्यासाठी अनुभव पणास लावला.
शेजारील शेतकरी, नागरिक यांच्याशी संपर्क साधून तसेच मयताने परिधान केलेल्या शर्टाच्या टॅग वरून, तब्बल चार तासांनी अखेर मयताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान खून करणा-यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले तर फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी उपस्थित झाली. वरिष्ठ पोलिस अधिकारी मेघना नागराज यांनी घटनास्थळाला भेट दिली.
यानंतर पोलिसांनी तांत्रिक घटनाचे विश्लेषण करून, सिसिटीव्ही फुटेज, मोबाईल रेकॉर्ड आदींचा अभ्यास करून आरोपी शिवाजी दत्तू दूधनाळे वय ३२ यास रात्री उशीरा शेतातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. तर पत्नी गौरी शाहूराज सूर्यवंशी वय ३४ हीला ही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आरोपीने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की मयताची पत्नी गौरी व आरोपी शिवाजी यांचे अनैतिक संबंध होते. यामुळे शाहूराज व गौरी यांच्यात सतत भांडण व्हायचे. यामुळे शाहूराजचा कायमचा काटा काढण्यासाठी आरोपी शिवाजी व गौरी यांनी रविवारी पहाटे आरोपी शिवाजी याने मयत शाहूराज याला दारू पाजविली. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बायपास जवळच्या कोरेगाववाडी येथील रस्त्यावर नेऊन डोळ्यात मिरची पावडर घालून रस्त्यावर पाडले.
Crimenews /नंतर संधी साधून आरोपी शिवाजी याने मयत शाहूराज याच्या डोक्यात हंटर व दगडाने जबर मारहाण केली. यात शाहूराज सूर्यवंशी याचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी दिली.








