प्रतिनिधी सचिन वाघे
समुद्रपूर, : समुद्रपूर तालुक्यातील करुर (प) येथील रहिवासी श्री. मल्हार बाबाराव साबळे यांनी एक एकर क्षेत्रामध्ये गांजा लागवडीसाठी शासकीय परवानगी मिळावी म्हणून तहसिल कार्यालय समुद्रपूर येथे अर्ज सादर केला आहे. दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्राप्त झालेल्या या अर्जावर तहसिल कार्यालयाने प्राथमिक नोंद घेतली असून, कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून तो पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.
तहसिलदार, समुद्रपूर यांनी दिनांक 20/11/2025 अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अर्जदाराने 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत लागवडीस परवानगी देण्याची मागणी केली आहे. तथापि, गांजा लागवड ही अत्यंत संवेदनशील व कायदेशीर बंधनांशी संबंधित बाब असल्याने, अंतिम निर्णय देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित प्राधिकरणाकडे आहे.
या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासन व नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार कायद्याअंतर्गत वैद्यकीय, औषधी किंवा संशोधनासाठी अशा लागवडीस विशेष परवानगी दिली जाऊ शकते, मात्र त्यासाठी कठोर अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक असते.
या घडामोडीकडे कृषी विभाग, महसूल विभाग आणि कायदा अंमलबजावणी पोलीस यंत्रणांचेही लक्ष वेधले गेले आहे. अर्जावरील अहवाल, क्षेत्र पडताळणी आणि इतर कायदेशीर बाबींची तपासणी झाल्यानंतरच जिल्हाधिकारी कार्यालय परवानगी बाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे प्रशासनिक सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
Farmernews /स्थानिकांत या प्रकरणाविषयी उत्सुकता वाढली असून, पुढील काही दिवसांत जिल्हा प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








