Hingnghatnews /हिंगणघाटमध्ये भाजपची सत्ता; जनतेचा कौल भाजपच्या विकासाला, नयना उमेश तुळसकर नगराध्यक्षपदी विजयी

0
18

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : हिंगणघाट नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक व दणदणीत विजय मिळवत शहराच्या राजकारणात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या नयना उमेश तुळसकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असून, हा विजय म्हणजे भाजपच्या विकासकामांवर जनतेने टाकलेली शिक्कामोर्तबच असल्याची भावना व्यक्त होत आहे.

नगर पालिकेच्या एकूण २० प्रभागांपैकी बहुसंख्य प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांनी विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. शहरातील विकास, पारदर्शक कारभार आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा प्रभावी लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या भाजपच्या धोरणाला मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला आहे.

प्रभाग क्रमांक ३ ते २० दरम्यान बहुतांश ठिकाणी भाजप उमेदवारांनी बाजी मारली असून, प्रभाग क्रमांक ५, ६, १०, ११, १३, १४, १६, १७ आणि १८ मध्ये भाजपने दुहेरी विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली. काही प्रभागांमध्ये अपक्ष व इतर पक्षांचे उमेदवार निवडून आले असले, तरी एकूण चित्र भाजपच्या बाजूने झुकलेले स्पष्टपणे दिसून आले.

या विजयामुळे शहरात भाजप कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

हिंगणघाटच्या विकासासाठी भाजपला मिळालेला हा कौल म्हणजे आमदार समीर कुणावार यांच्या स्थिर, सक्षम व विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here