Home जळगाव Tahsilnews/अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीत वरणगावला पुन्हा डावलले !

Tahsilnews/अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीत वरणगावला पुन्हा डावलले !

 

जामनेर, चाळीसगाव, जळगावला हिरवा कंदील; मग वरणगाववरच अन्याय का?मंजुरी मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही; महसूलमंत्री बावनकुळे यांना नगराध्यक्ष सुनील काळे यांचा थेट सवाल

वरणगाव ता भुसावळ :

Bhusavalnews जळगाव जिल्ह्यात जामनेर, चाळीसगाव आणि जळगाव येथे नव्याने अप्पर तहसील कार्यालयांना राज्य शासनाने मंजुरी दिली; मात्र सुमारे ६० हजार लोकसंख्या आणि २८ गावांचा प्रशासकीय संपर्क असलेल्या वरणगावच्या मागणीला अद्याप मंजुरी का नाही? असा थेट आणि संतप्त सवाल उपस्थित करीत लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शासनाच्या निर्णयाकडे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी अप्पर तहसील कार्यालये मंजूर होत असताना वरणगावला मात्र प्रतीक्षेत ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

ब्रिटिश काळात तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या वरणगावला पुन्हा प्रशासकीय सुविधांपासून वंचित का ठेवले जात आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वरणगाव आणि परिसरातील २८ गावांतील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी भुसावळ येथे जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचविण्यासाठी वरणगाव येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती होणे आवश्यक असल्याची मागणी सातत्याने होत आहे.varngaonnews

महसूलमंत्र्यांचे लेखी निर्देश, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्तावही दाखल!वरणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर व्हावे, यासाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.jalgaonnews

या मागणीची दखल घेत महसूलमंत्र्यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना वरणगावचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे लेखी निर्देश दिले होते.

त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने वरणगाव हे भुसावळ तालुक्यातील मोठे शहर असून, लोकसंख्या आणि परिसरातील गावांची प्रशासकीय गरज लक्षात घेता येथे अप्पर तहसील कार्यालय होणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करीत प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत राज्याचे अपर मुख्य सचिव विकास खरगे यांच्याकडे पाठविला होता. महसूलमंत्र्यांनीही या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत भूमिका घेतल्याचे नगराध्यक्ष काळे यांनी सांगितले.

मात्र, प्रत्यक्ष मंजुरीच्या वेळी जामनेर, चाळीसगाव आणि जळगावला प्राधान्य मिळाले, तर वरणगावचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित राहिला. त्यामुळे एवढा पाठपुरावा, लेखी निर्देश आणि जिल्हास्तरावरून प्रस्ताव पाठवूनही वरणगावच्या पदरी प्रतीक्षाच का? असा सवाल उपस्थित होत आहे.

‘वरणगाववर अन्याय सहन करणार नाही!’
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मोबाईलवरून थेट संपर्क साधत वरणगावच्या मागणीचा मुद्दा पुन्हा जोरकसपणे मांडला. ‘देवा भाऊंचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. मग वरणगावच्या जनतेवर अन्याय का? जिल्ह्यात इतर ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय मंजूर होत असताना वरणगावला का डावलले जात आहे? वरणगावच्या जनतेला न्याय द्या आणि प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी द्या,’ अशी आग्रही विनंती त्यांनी महसूलमंत्र्यांकडे केली.

‘जिथपर्यंत वरणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर होत नाही, तिथपर्यंत या मागणीचा पिच्छा सोडणार नाही. वरणगावच्या जनतेच्या हक्कासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार,’ असा ठाम निर्धार नगराध्यक्ष सुनील काळे यांनी व्यक्त केला.

Tahsilnews/आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष शासन निर्णय हवा, अशी अपेक्षा वरणगावसह परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. महसूलमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनंतरही प्रलंबित राहिलेल्या या प्रस्तावाला शासन कधी हिरवा कंदील दाखवणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.