तामगाव पोलिस स्टेशनमध्ये २०२२ मध्ये दाखल झालेल्या अपहरण प्रकरणाचा धागा बुलढाणा पोलीसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अखेर पकडला आहे. तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा आणि तिला पळवून नेणाऱ्या संशयिताचा शोध मध्य प्रदेशातील प्रितमपूर (जि. इंदूर) येथे लावण्यात आला.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील अपहरण प्रकरणांच्या तपासात पोलिस दलाने मिळवलेले हे महत्त्वाचे यश मानले जात आहे.
पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व अपहरण प्रकरणांचा सखोल तपास करून पीडित मुले आणि आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी विशेष पथकाला शोधमोहीम राबवण्याचे निर्देश दिले.
तामगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण हाताळण्यात आले. त्यामध्ये पीडित मुलगी आणि संशयित विक्की प्रकाश गव्हांदे (वय २६, रा. वकाना, ता. संग्रामपूर) हे इंदूर जिल्ह्यात लपल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार ११ नोव्हेंबर २०२५ रोजी तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने प्रितमपूर परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली.
काही तासांच्या सततच्या शोधानंतर पथकाने अल्पवयीन मुलगी आणि आरोपी विक्की गव्हांदे यांना शोधून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर दोघांना सुरक्षितपणे तामगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास तामगाव पोलिस करत आहेत. या प्रकरणाच्या उलगड्यानंतर आता अन्य काही प्रकरणेही पोलिसांच्या रडारवर असून त्याचाही उलगडा होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई एसपी निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा (खामगाव), अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
ऑपरेशनचे नेतृत्व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील आणि प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी केले.
Tamgaonnews/पथकात पोलिस उपनिरीक्षक संजय ठाकरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर बोरसे, अविनाश जाधव, महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल निर्मला कंकाळ, चालक सचिन शेंद्रे, तसेच राजू आडवे सहभागी झाले होते.







