उमरगा: उमरगा ते औसा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ वरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण स्वामी यांनी या महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले आहे. Dharashivnews
या मार्गावर खड्ड्यांमुळे लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाहनचालकांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींचे मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत होता.
यामुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली होती.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार प्रवीण स्वामी यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली. यावेळी रस्त्याची चाळण झालेली पाहून त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.umrganews
“नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून मार्ग सुस्थितीत करावा, अन्यथा संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला. या पाहणी दौऱ्यावेळी युवा नेते अजिंक्य पाटील उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा, धाराशिव








