मलकापूर- देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा परिसराची साफसफाई करण्यात येवून पुतळा परिसरात सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीेने आज ७ सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी न.प. मलकापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान यावेळी एकही अधिकारी हजर नसल्याने सदरचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खाली खुर्चीला देण्यात आले.
मलकापूर शहराच्या तहसील चौकामध्ये देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. काही महिन्यांपासून या पुतळा परिसरामध्ये न.प.च्या वतीने कुलूप लावण्यात आलेले असून या परिसरात आजरोजी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तेव्हा या परिसराची तात्काळ साफसफाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आज रोजी पुतळा परिसरात झालेली घाण पाहता ही एक प्रकारे विटंबनाच होत असल्याचा प्रकार आहे. तेव्हा होत असलेली विटंबना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सहन करण्यात येणार नाही. तात्काळ याबाबत कार्यवाही न केल्यास प्रहारच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल, याची सर्वस्व जबाबदारी न.प. प्रशासनाची राहील, असेही निवेदनाच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी उपजिल्हा प्रमुख अजय टप, तालुका प्रमुख अजित फुंदे, युवा तालुका प्रमुख अमोल बावस्कार, युवा शहर प्रमुख संतोष जाधव, बळीराम बावस्कर, अपंग क्रांती आंदोलन संघटना तालुका प्रमुख दत्ता पाटील, सुर्यकांत महाजन आदी उपस्थित होते.