कचरा संकलन कंपन्यांवर आर्थिक दंड करा आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे सक्त निर्देश

 

(सूर्य्या् मराठी न्युज ब्युरो)

 

नागपूर, ता. १६ : शहरातील नागरिकांच्या कच-याच्या समस्या सुटावी संपूर्ण शहरातील कच-याबाबतचे कार्य सुरळीत व्हावे यासाठी मनपाद्वारे बीव्हीकजी आणि एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. सुरूवातीच्या काळात दोन्ही कंपन्यांकडून उत्तम कार्य झाले. मात्र सद्या दोन्ही कंपन्यांच्या संदर्भात नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. शिवाय कंपन्यांकडून निविदेमध्ये नमूद बाबींची पूर्तताही केली जात नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील प्रत्येक घरातील, व्यावसायीक प्रतिष्ठानांमधील कचरा योग्यरित्या संकलित न करण्याच्या तक्रारींवर दोन्ही कंपन्यांवर मोठा आर्थिक दंड (हेवी पेनॉल्टी) लावण्याची सक्त ताकीद आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.
विविध विषयांच्या अनुषंगाने बुधवारी (ता.१६) आरोग्य समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, समितीच्या सदस्या आशा उईके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, टाटा ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. टिकेश बिसेन उपस्थित होते. याशिवाय समितीच्या सदस्या लीला हाथीबेड, सरीता कावरे, उज्ज्वला लांजेवार, विशाखा बांते यांनी व्हिडिओ कॉन्फर्निंगच्या माध्यमातून बैठकीत सहभाग नोंदविला.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नागपूर महानगरपालिका सुरूवातीला ५८व्या क्रमांकावर होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वात झालेल्या कार्यामुळे मनपाने १८वे स्थान प्राप्त केले. या यशाबद्दल वीरेंद्र कुकरेजा यांनी आरोग्य विभागाचे अभिनंदन केले व यावेळी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये १०व्या क्रमांकाच्या वरचेच स्थान प्राप्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली. समितीच्या सदस्या आशा उईके यांनी ‘बेटी बचाव’ अभियानाद्वारे कॅन्सरची लस देण्यात येते. मात्र त्या लसीसाठी नागरिकांना सुमारे ३५०० रूपये खर्च करावा लागतो. ही लस मनपाद्वारे मोफत देण्याची मागणी केली. आशा उईके यांच्या प्रस्तावावर आरोग्य विभागाद्वारे चर्चा करून त्याबाबतची माहिती सादर करण्याचे निर्देश वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
बैठकीत प्रारंभी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांनी मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. कोव्हिडचे रुग्ण वाढलेले असताना मनपाद्वारे ६६ खाजगी रुग्णालयांना कोरोनाबाधितांवर उपचारासाठी परवानगी देण्यात आली होती. यापैकी काही रुग्णालय रुग्णांकडून जादा पैसे घेत असल्याची तक्रार प्राप्त होताच मनपा आयुक्तांच्या आदेशाने प्रत्येक रुग्णालयामध्ये ऑडिटर नियुक्ती करण्यात आले. या ऑडिटरकडून रुग्णालयाचे बिल तपासल्यानंतरच रुग्णांना भरावे लागते, अशी माहिती डॉ.प्रवीण गंटावार यांनी यावेळी दिली. मनपाद्वारे नियुक्त सर्व ऑडिटरची माहिती आणि त्यांच्याकडून ऑडिट झालेल्या बिलांचा अहवाल पुढील बैठकीत समितीपुढे सादर करण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
कोव्हिडच्या संकट काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून अनेक डॉक्टर, नर्स तसेच आरोग्य कर्मचा-यांनी अहोरात्र सेवा दिली. प्रामाणिकपणे दिवस-रात्र अनेकांनी नि:स्वार्थ भावनेने काम केले. मात्र याच काळात काहींनी संधी म्हणून फायदा घेत रुग्णांकडून मनमानीपणे बिल वसूल करण्याचे काम केले. संकटाच्या प्रसंगी सेवाकार्य न बजावता पैशाला प्राधान्य देणा-या अशा खाजगी रुग्णालयांवर सक्त कारवाई करा, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
नागपूर शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या कमी आहे. सध्या शहरात २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ही संख्या वाढून ५० होणे गरजेचे आहे. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या रहिवासी परिसरात उपलब्ध व्हावी यासाठी शहरातील प्रत्येक भागात मनपाचे आरोग्य केंद्र व्हावे यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापतींनी दिले.

कोरोना लस संदर्भात दिशानिर्देशानुसार कार्यवाही करा
कोरोनाची लस उपलब्ध झाली असून नागपूर शहरामध्येही लवकरच ती तीन टप्प्यामध्ये देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवेतील कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी शहरातील सर्व खाजगी, शासकीय रुग्णालयांकडून कर्मचा-यांची माहिती मागवून त्याचा डेटाबेस तयार करण्यात येत आहे. नागपूर शहरामध्ये ६४० खाजगी रुग्णालये, ५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मनपाचे ६२ रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सर्वांकडून माहिती मागविण्यात येत असून आतापर्यंत ११ हजार ५६० कर्मचा-यांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्यात आली आहे व उर्वरित माहितीही मागविण्यात येत असल्याची माहिती यावेळी आरोग्य विभागाकडून देण्यात आली. कोरोना लसी संदर्भात केंद्र आणि राज्य शासनाकडून दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. या दिशानिर्देशांचे काटेकोर पालन करून तिन्ही टप्प्यामध्ये नागरिकांना लस योग्यरित्या उपलब्ध व्हावी, याबाबत तातडीने कार्यवाही करा, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

Leave a Comment