चिखली येथे महीला पोलिस कर्मचारी आणि मुलीची चाकुने हत्या करून पतीची गांगलगाव परिसरात विहीरीत गळफास घेऊन आत्महत्या

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

चिखली पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस कर्मचारी वर्षा किशोर कुटे यांच्यासह त्यांच्या चिमुकलीची पोटात चाकू खुपसून निर्घृण हत्या करून पतीनेही कवठळ शिवारात विहिरीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना आज (दि.२१) सकाळी उघडकीस आली आहे.

चिखली येथील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात हे हत्याकांड घडले असून, पती किशोर जर्नाधन कुटे (रा. खैरव) यांनी कवठळ येथील गांगलगाव रोडलगत असलेल्या विहिरीत गळफास घेतल्याचे आढळून आले. चिखली व अंढेरा पोलिस या घटनेचा तपास करत असून, या हत्याकांडाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नव्हते.

वर्षा दंदाले-कुटे या चिखली पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना एक दीड वर्षाची चिमुकलीदेखील आहे. पती किशोर कुटे यांनी या मायलेकींचा पोटात चाकूने खुपसून खून करून घटनास्थळावरून पोबारा केला, व नंतर गांगलगाव रोडनजीकच्या विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. कवठळ येथे गांगलगाव रोड लगत असलेल्या विहिरीत दोरीच्या साह्याने अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याचे आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास दिसून आले होते.

त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. विहिरीचे शेतमालक विष्णू हिम्मतराव वाघमारे हे नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता शेतात गेले असता, डांबर रोडवर एमएच २८ डब्ल्यू ९९७२ काळ्या रंगाची स्कुटी उभी असलेली त्यांना दिसून आली. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, विहिरीत गळफास घेतलेला इसम दोरीला लटकलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला.

अंढेरा पोलीस स्टेशनला माहिती देतात क्षणाचा विलंब न लावता अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार हरिहर गोरे, बीट जमालदार उगले हे घटनास्थळी धावून आले.

पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, दोरी कमकुवत असल्याने मृतदेह विहिरीत पडला. नंतर खाटाच्या साहाय्याने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, चिखली येथील पंचमुखी महादेव मंदीर परिसरात पोलिस कर्मचारी महिलेसह तिच्या दीड वर्षीय चिमुकलीची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते.

तर कवठळ परिसरातील मृतदेह हा संबंधित पोलिस कर्मचारी वर्षा दंदाले-कुटे यांच्या पतीचा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पत्नी व मुलीची हत्या करून पतीनेही आत्महत्या केली असावी, असा कयास बांधला जात होता. अधिक तपास चिखली व अंढेरा पोलिस करत आहेत.

Leave a Comment