इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
धनगर समाजाला घटनात्मक रित्या मिळालेल्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवल्या जात आहे धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी धनगर समाज तर्फे मुख्यमंत्र्याकडे सिंदखेड राजा तहसीलदार यांच्यामार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की आम्ही धनगर जमातीचे नागरिक संविधानात्मक मिळालेल्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या लाभापासून वंचित असुन हा आमच्यावर सामाजिक अन्याय झालेला आहे.
ज्यामुळे आमची जमात विकासाच्या प्रवाहापासून दुर आहे. त्यामुळे आमच्या जमातीच्या प्रश्नावर कोणत्याही नेत्याच्या मध्यस्थीशिवाय आमच्या समवेत चर्चा करण्यासाठी आपण वेळ द्यावा व आमच्या समस्या समजून घ्याव्यात तसेच आमच्या जमातीमधील काही पुढारी त्यांच्या समर्थकासह शिष्टमंडळाच्या माध्यमातून सरकार पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून वैयक्तिक लाभ मिळवतात जे जमातीच्या हिताचे नाही.
याकरिता खालील न्याय व संविधानात्मक मागण्यांवर सरकारने संवेदनशीलपणे सकारात्मक निर्णय घ्यावेत याकरिता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन करीत आहोत. आम्हांला न्याय मिळावा यासाठी आम्ही भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाही मार्गाचा अवलंब करीत आहोत सरकारने आमचे प्रश्न निकाली काढुन आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती करीत आहोत.