नाशिक येथे मेडिकल टुरिझम हब निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री छगन भुजबळ पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘ट्रु केअर’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

 

सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी

पर्यटन, कृषी, चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधासाठी नाशिक जिल्हा संपूर्ण राज्यात ओळखला जातो. त्या बरोबरच नाशिक आता चांगल्या आरोग्य सुविधेसाठीही ओळखला जातो. भविष्यात उत्तम व वाजवी आरोग्य सुविधांसाठी जगातून लोकांनी नाशिकला येणे पसंत करावे यासाठी ‘मेडिकल टुरिझम हब’ निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

देवळाली गांव येथील ट्रु केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खाटांच्या कोविड केअर सेंटर लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी आमदान सरोज आहिरे, महानगर पालिकेचे स्थायी समिती सभापती गणेश गिते, रंजन ठाकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी, डॉ. स्वप्निल इंगळे, डॉ.विजय पवार उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, ट्रु केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे 100 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. ट्रु केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये कोरोनाच्या उपचारांबरोबरचं इतरही आजरांवर उपचार केले जाणार असल्याने स्थानिक नागरिकांना या लाभ होणार आहे. या रुग्णालयात कोरोनासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांची उभारण्यात करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटर मध्ये 50 आयसीयू बेड्सची व्यवस्था आहे, त्याबरोबरच पुरूषांसाठी 30 व महिलांसाठी 20 बेड्स जनरल वॉर्डची व्यवस्था करण्यात आली असून अद्यावत लॅब, सिटी स्कॅनसह 24 तास मेडिकलची सुविधा देण्यात आली आहे. ट्रु केअर रुग्णालयानेही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वाजवी दरात रुग्णांवर उपचार करावे अशी अपेक्षाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.

ठक्कर डोम आणि पोलीसांसाठी तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमुळे इतर रुग्णालयांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत झाली आहे. कोरोनासारख्या कठीण काळातही खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सुद्धा कुठलाही विचार न करता सेवा दिली आहे. कोरानाकाळात डॉक्टरांनी एखाद्या देवदूतांप्रमाणे काम केले असून ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

नाशिकचा मृत्युदर कमी
जास्तीत जास्त तपासणी मोहिम राबवून कारोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण शोधण्यात आरोग्य विभागाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याचा परिपाक म्हणून पॉझिटीव्ह रुग्णांवर तात्काळ उपचार झाले आणि राज्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर कमी ठेवण्यात आपल्याला यश मिळालं असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ यशस्वी करुया!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सातत्याने आढावा घेऊन आपण कोमॉर्बिड रुग्णांच शोध घेऊन कोरोनाला अटकाव करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहोत. परंतु कोरोनाशी लढण्याची सर्वांची सामुहीक जबाबदारी असल्याने शासनाने हाती घेतलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडली तरच कोरोनाला हद्दपार करण्यात आपल्याला यश मिळणार आहे.त्यामुळे शासनाची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडावी, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

Leave a Comment