अजहर शाह मोताळा
बुलडाणा.दि.8.जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी योजनेतंर्गत एक मोठा व पाच लघु पाटबंधारे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या निर्माणाधीन प्रकल्पांना जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न राहणार असून सदर प्रकल्प यंत्रणेने गतीने पुर्ण करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात सिंचन प्रकल्पांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेत असताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, विभागीय पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अनिल बहादूरे, विशेष प्रकल्प अधिकारी आशिष देवगडे, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर आदी उपस्थित होते.
जिगांव या महत्वाकांक्षी प्रकल्प गतीने पुर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे मंत्रालयात स्वतंत्र बैठक लावण्यात येणार असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले, जिगांवच्या बैठकीत प्रकल्पाच्या सर्व बाबींनी आढावा घेतला जाईल. यामध्ये निधीची तरतूद, भूसंपादन, भूसंपादन कायद्यांनुसार झाडे व तत्सम बाबींचा देण्यात येणारा मोबदला, मोबदला देण्याबाबत महसूल व जलसंपदा विभागाचा असलेला संभ्रम आदींविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. सरळ खरेदी प्रक्रिया ही विनाविलंब होणारी असल्यामुळे या प्रक्रियेचा अवलंब प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार करण्यात यावा. या प्रक्रियेने शेतकऱ्यांना लगेच मोबदला मिळतो.
पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याबाबत सुचना देताना जलसंपदा मंत्री म्हणाले, पेनटाकळी प्रकल्पाचा 11 किलोमीटरचा कालवा आहे. या कालव्याद्वारे पाणी सोडल्यामुळे आजूबाजुच्या शेतीचे नुकसान होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तरी प्रकल्पाची चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यतेमध्ये या कालव्याच्या दुरूस्ती, बंद पाईपद्वारे सिंचनासाठी पाणी देण्याच्या बाबीचा समावेश करण्यात यावा. त्यानंतर सुप्रमा प्रस्ताव राज्यस्तरीय समितीची मंजूरी घेवून पाठविण्यात यावा. या कालव्याचे पाणी वितरण बंद पाईपद्वारेच करण्यात यावे. चतुर्थ सुप्रमा ही 416.59 कोटी रूपयांची आहे.
पालकमंत्री डॉ शिंगणे यावेळी म्हणाले, खडकपूर्णा प्रकल्पामध्ये पुनर्वसनाचे बाकी असलेल्या कामात नागरिकांच्या मागणीचा विचार करीत काम करावे. जिगांव प्रकल्पाच्या बाबतीत मोबदला देण्याबाबत यंत्रणांनी समन्वय साधून शेतकऱ्यांना मोबदला मिळवून द्यावा. याबाबत जलसंपदा विभागाने तोडगा काढावा. याप्रसंगी आमदार संजय रायमूलकर यांनी पेनटाकळी कालवा पाईपबंद करणे, लोणार तालुक्यातील बोरखेडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याची उंची कमी करणे, पेनटाकळी गावाच्या गावठाणाची हद्दवाढ करणे आदी मागण्या मांडल्या. आमदार संजय गायकवाड यांनी मोताळा तालुक्यातील राहेरा प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करून सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. बैठकीत अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी सादरीकरण केले. बैठकीला जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हयातील पुर्ण व निर्माणाधीन सिंचन प्रकल्प
पुर्ण प्रकल्प : मोठे 2, मध्यम 7 व लघु 100, अशाप्रकारे 109 प्रकल्प पूर्ण. पुर्ण झालेल्या प्रकल्पातून निर्माण झालेला पाणीसाठा 606.57 दलघमी, सिंचन क्षमता 90178 हेक्टर, निर्माणाधीन प्रकल्प : मोठे 2 (जिगांव व अनुशेष व्यतिकरिकत् एक पेनटाकळी), लघु 5 (राहेरा, चौंढी, आलेवाडी, अरकचेरी, बोरखेडी) एकूण 7. बांधकामाधीन प्रकल्पाची अंतिम सिंचन क्षमता 106553 हे, निर्माण झालेला पाणीसाठा 67.35 दलघमी, सिंचन क्षमता 14232 हे. प्रत्यक्ष झालेले सिंचन (सन 2019-20) 10159 हे.