पंचनाम्यांची औपचारीकता न करता अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या…

 

रविकांत तुपकर यांची मागणी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मांडली नुकसानीची दाहकता

बुलडाणा :- पंकज थिगळे

*बुलडाणा :-* अतिपावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि अनेक ठिकाणी जमिनींचेही मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी दुबार पेरण्याकरुनही पिके पाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमिनीत पाणी साचल्याने दुबार पेरणी देखील करता आली नाही. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई म्हणून मदत करणे आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती पाहता शासनाने पंचनामे करण्याची औपचारीकता न करता सरकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

रविकांत तुपकर यांनी आज २ ऑगस्ट रोजी मुंबई येथे मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची दाहकता निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत रविकांत तुपकर यांची ना.फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा देखील झाली. राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती ओढावली. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले. लाखो हेक्टर जमीनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच शेतकऱ्यांना लिकिंग पद्धतीने जबरदस्ती जास्तीचे पैसे देवून खते घ्यावी लागली. खतांच्या वाढलेल्या किंमती आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला, पेरणीसाठी यावर्षी अधिक खर्च करावा लागला त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याने शेतकरी आता आर्थिक अडचणीत आहेत. शिवाय लाखो शेतकऱ्यांना अद्यापही पीककर्ज मिळले नाही. त्यातच झालेल्या अतिपावसाने पेरणी उलटली आहे. काही ठिकाणी दुबार पेरणी करुनही पिके पाण्याखाली गेली तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पुन्हा पेरणी करणेही शक्य झाले नाही. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशात राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे. परंतु आतापर्यंत पंचनामे देखील करण्यात आले नाहीत, हे दुर्दैव आहे.

आता राज्य शासनाने पंचनाम्यांची औपचारिकता न करता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी,अशी मागणी रविकांत तुपकर यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या मागण्यांचे लेखी निवेदनही त्यांनी दिले.

*मदतीसाठी सरकार सकारात्मक*

रविकांत तुपकर यांच्या मागण्या समजून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. लवकरच याबाबत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना समाधानकारक मदत देणार असल्याची ग्वाही त्यांनी रविकांत तुपकर यांना दिली.

Leave a Comment