अजहर शाह मोताळा प्रतिनिधी
बुलडाणा:-जागतिक जलदिन 22 मार्च निमित्त दि. 16 ते 22 मार्च 2021 या कालावधीत जिल्हयात जलजागृती सप्ताहचे उदघाटन बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडाचे अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर यांचे हस्ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोविड-19 नियमांचे पालन करून करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत सिंचनात 10 टक्के वाढ करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
अधीक्षक अभियंता यांचे दालनात झालेल्या कार्यक्रमात जिल्हयातील खडकपुर्णा, पैनगंगा, वान, मन, नळगंगा, पुर्णा, ज्ञानगंगा, विश्वगंगा या प्रमुख नद्यांचे जलपुजन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी नितिन सुपेकर यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा वाचन करुन पाणीबचतीचे महत्व जनतेस पटवुन देण्याचे आवाहन केले. या सप्ताहा दरम्यान दि. 17 ते 21 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करतांना स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार कोव्हीड प्रादुर्भावाच्या लागु असलेल्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करावे, नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याच्या आवाहन अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी केले. जलजागृती सप्ताहात पाणीबचती विषयी जनजागृती करणे, विभागाच्या वाहनांवर पोष्टर्स लावणे, पाणीबचती विषयी मान्यवर वक्त्यांचे प्रबोधनपर सेमिनार आयोजित करणे, मान्यवरांच्या पाणी बचत, पाणी वापर संस्था व कालवा स्वच्छता ईत्यादी विषयावर यशोगाथा आयोजित करणे. सोशल मिडीयावर पाणी बचती विषयी जनजागृती करणे अशाप्रकारे जास्तीत जास्त ONLINE स्वरुपात साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
यावेळी प्रमुख उपस्थितीत पेनटाकळी पाणी वापर संस्थांच्या महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर यांनी पाणीवापर संस्था व जलसंपदा विभाग यांच्या समन्वयाने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे महत्व विषद करुन, पाणी ही काळाची गरज असुन, पाणी बचत करणे आवश्यक असल्याचे सांगीतले. उपकार्यकारी अभियंता श्रीमती क्षितीजा गायकवाड यांनी याप्रसंगी गृहीणींनी दैनंदिन
काम काजासाठी आवश्यक पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहा.अधिक्षक अभियंता तुषार मेतकर, शाखा अभियंता अनिल खानजोडे, सहा.अधिक्षक अभियंता अंकुश गावित, लघुलेखक भरत राऊत, करण उमाळे, नितीन डब्बे, शत्रुघ्न धोरण, शेख ग्यासुद्दीन आदींनी प्रयत्न केले. संचालन व आभार प्रदर्शन मनजीतसिंग राजपुत यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.







