दगडू पिंगळे निलंगा प्रतिनिधी
निलंगा : लोकसभा निवडणुकीला आणखी कालावधी बाकी असला तरी काही उत्साही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भावी खासदार म्हणून कार्यकर्त्यांकडून उल्लेख होत आहे, त्यामुळे निलंगा येथील विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात माजी मंत्री, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी भरकार्यक्रमात शृंगारे साहेब… येत्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी तुम्हालाच आहे. चांगले काम करा, केंद्रात मंत्रीही म्हणून जाल, असा उल्लेख करून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले, यामुळे सध्या तरी उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
निलंगा शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण दोन दिवसांपासून सुरू असून या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनीधी उपस्थिती राहत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारेही संत तुकाराम महाराज मंदीर सभागृह व ‘अटल वाॕक वे’ च्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते. लोकसभा निवडणुका दूर असल्या तरी भारतीय जनता पक्षामध्ये अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना ‘खासदारकीचे’ स्वप्न पडू लागले आहे. काही पदाधिकाऱ्यांना, तर चक्क भावी खासदार म्हणून संबोधले जात आहे. ही बाब माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्याही कानावर पडत आहे.