अनिलसिंग चव्हाण ( संपादक )
खामगाव : शहरातील केला नगर परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात खामगाव शहर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी अमरावती येथील एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून अंदाजे २ लाख १६ हजार ३२० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
Crimenews /याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी साकेत संजय दशोत्तर रा. केला नगर, देशमुख मंगल कार्यालयाच्या मागे, खामगाव यांनी २६ फेब्रुवारी रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० ते ५.३० दरम्यान ते कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
घरातील लोखंडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण अंदाजे १ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली होती.
या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान सुरुवातीला कोणताही ठोस धागादोरा मिळत नसल्याने पोलिसांसमोर गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान होते. मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सिमा परवीन नसीम शेख रा. साजिया नगर, हेदरपुरा, अमरावती हिला निष्पन्न करून ताब्यात घेतले.
तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यात सोन्याची अंगठी, कानातील झुमके, मंगळसूत्र पोत, नथ तसेच सोन्याच्या टिकल्या असा अंदाजे २ लाख १६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तपासात आरोपी महिलेने शेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतही तत्सम गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून त्या अनुषंगाने तेथील कलम ३३१(१), ३०५ भारतीय न्याय संहिता २०२३ मधील गुन्हाही उघडकीस आला आहे.
Policenews /ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर. एन. पवार यांच्या आदेशाने पोहेकॉ सागर भगत, पोका अंकुश गुरुदेव, पोका राहुल धारकर, मपोका दिव्या काळे, योका राम धामोडे, पोहेकॉ प्रदीप मोठे, भिमराव वानखेडे, पोका गणेश कोल्हे, पोका निशांत कळसकर व रविंद्र कन्नर यांनी केली.








