प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट : शहरातील यशवंत नगर परिसरातील कथित अतिक्रमण हटविण्याच्या प्रकरणाने आता गंभीर वादाचे स्वरूप धारण केले असून, बिल्डर आशिष जाणा यांच्या बुलडोजर कारवाईविरोधात झोपडपट्टीधारकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला आहे.
नोटीसविना संडास, बाथरूम, पक्के शेड आणि इतर बांधकामे पाडण्यात आल्याचा आरोप होत असून, या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया, प्रशासनाची भूमिका आणि बिल्डरांकडून कथित दबावतंत्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.wardhanews
गेल्या ५५ ते ६० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांना निवेदन देत बुलडोजर कारवाईमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, पुनर्वसन आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागा खरेदी केल्यानंतर कोणतेही अधिकृत मोजमाप, लेखी नोटीस किंवा अंतिम प्रशासकीय परवानगी न घेता कारवाई करण्यात आली. Hingnghatnews
झोपडपट्टीधारकांनी महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा उल्लेख करत, कोणतीही तोडफोड करण्यापूर्वी ३० दिवसांची लेखी नोटीस देणे बंधनकारक असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या कारवाईमुळे महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक कुटुंबांवर उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, परिसरातील सुमारे ५० ते ७० झाडे तोडण्यात आल्याचाही आरोप समोर आला आहे. वृक्षतोडीसाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आशिष जाणा बिल्डर यांची प्रतिक्रिया
“मी माझी जागा लेव्हल केली. त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढले. विषय तसा आला नाही त्यामुळे कायदेशीर कागदपत्रांचा विषय झाला नाही,” अशी भूमिका बिल्डर आशिष जाणा यांनी मांडली. मात्र त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे प्रकरण आणखी चर्चेत आले असून, नागरिकांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नगरसेवक विक्की वाघमारे यांची प्रतिक्रिया
स्थानिक नगरसेवक विक्की वाघमारे यांनी सांगितले की, “अतिक्रमण धारक आणि आशिष जाणा यांच्यात वाद सुरू होता. यावर मोजणी करून निर्णय घेण्यात येईल, असे ठरले होते. मात्र त्यानंतरही अतिक्रमण हटविण्यात आले. त्यांनी शब्द पाळला नाही आणि विश्वासघात केला.”
माजी नगरसेवक मनिष देवडे यांची प्रतिक्रिया
माजी नगरसेवक मनिष देवडे यांनी “अतिक्रमणावरून वाद असला तरी मोजणी आणि प्रशासनाचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच पुढील कारवाई होणे अपेक्षित होते.
आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”
दरम्यान, शहरात काही बिल्डर विवादित किंवा मौल्यवान जागा कमी किमतीत खरेदी करून नंतर अतिक्रमण हटवून त्या जागांचे बाजारमूल्य वाढवत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भूमाफिया, विवादित जागांचे व्यवहार आणि अतिक्रमण हटविण्याच्या पद्धती पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
Wardhanews /नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत स्वतः मौका चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. आता प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.



