Home Breaking News NCMCCard/NCMC कार्डमध्ये बॅलन्स असतानाही महिलांना फुल तिकीट! वयोवृद्धांना बसमधून उतरवल्याचा आरोप; रयत...

NCMCCard/NCMC कार्डमध्ये बॅलन्स असतानाही महिलांना फुल तिकीट! वयोवृद्धांना बसमधून उतरवल्याचा आरोप; रयत क्रांती संघटनेचा आंदोलनाचा इशारा

2

 

जळगाव जामोद ते शेगाव एसटी बसमध्ये NCMC कार्डच्या वापराबाबत प्रवाशांकडून गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत.

आज दिनांक २ सप्टेंबर रोजी या मार्गावर प्रवास करणाऱ्या काही महिला, शाळकरी मुली आणि वयोवृद्ध प्रवाशांना तिकीट काढताना अडचणींचा सामना करावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे.NCMCCard

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, महिलांच्या NCMC कार्डमध्ये बॅलन्स उपलब्ध असतानाही संबंधित वाहकाने त्यांचे फुल तिकीट काढले. तसेच शाळकरी मुलींच्या कार्डमध्येही बॅलन्स उपलब्ध असताना त्यांना फुल तिकीट आकारण्यात आल्याचा आरोप आहे.

यासोबतच एक-दोन वयोवृद्ध प्रवाशांकडे फुल तिकीटासाठी पैसे उपलब्ध नसल्याने त्यांना बसमधून खाली उतरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.

ही बाब प्रवाशांनी रयत क्रांती संघटनेचे नाना गोल्हर (पाटील) यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने काथरगाव फाट्यावर संबंधित एसटी बस थांबवून चालक आणि वाहकाशी चर्चा केली.

दरम्यान, एसटीच्या NCMC कार्डची सुविधा किंवा सर्व्हरमध्ये काही तांत्रिक अडचण असेल, तर त्याचा दोष प्रवाशांचा काय? असा सवाल नाना गोल्हर (पाटील) यांनी उपस्थित केला आहे.

कार्डमध्ये बॅलन्स उपलब्ध असतानाही तांत्रिक कारणामुळे व्यवहार होत नसेल, तर प्रवाशांना फुल तिकीट काढण्यास भाग पाडणे किंवा तिकीटाचे पैसे न दिल्यास त्यांना बसमधून खाली उतरवणे योग्य आहे का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

तसेच महिला, विद्यार्थी आणि वयोवृद्ध प्रवाशांशी वाहकांनी सन्मानपूर्वक आणि नम्र भाषेत संवाद साधावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रवाशांशी अरेरावीची भाषा वापरली जात असल्यास त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या प्रकरणी DC मॅडमशी दोन-तीन वेळा फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र फोन रिसीव्ह झाला नसल्याचा दावा नाना गोल्हर (पाटील) यांनी केला आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, NCMC कार्डच्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि महिला, शाळकरी विद्यार्थी तसेच वयोवृद्ध प्रवाशांचा प्रवास सुलभ व सुरक्षित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास रयत क्रांती संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन उभारेल, असा इशारा नाना गोल्हर (पाटील) यांनी दिला आहे.

NCMCCard/आता एसटी महामंडळ या तक्रारीची दखल घेऊन काय भूमिका घेते आणि NCMC कार्डच्या समस्येवर कोणता तोडगा काढते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.