Akola प्रतिनिधी अशोक भाकरे
अकोला,दि. ३ जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करून दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत देशात सर्वोत्तम जिल्ह्याचा मान पटकविणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार-२०२१’ने गौरविण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
दिल्लीतील विज्ञान भवनात आज ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना’निमित्त सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्यावतीने वर्ष २०२१ आणि वर्ष २०२२ च्या ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ.
विरेंद्र सिंह, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि श्रीमती प्रतिमा भौमिक उपस्थित होते.
अपंगत्वावर मात करत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या देशातील दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, राज्य आणि जिल्हा आदींना यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
दिव्यांगांच्या सशक्तीकरणाकरिता शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजवाणीसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या श्रेणीत अकोला जिल्हा परिषदेला गौरविण्यात आले.
अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील दिव्यांगव्यक्तींचे सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या सर्वेक्षणामुळे दिव्यांगांसाठी असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना सुकर झाले आहे.
सांघिक भावनेने केलेल्या कार्यातूनच अकोला जिल्हा परिषदेने दिव्यांगांचे सर्वेक्षण कार्य पूर्ण केले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगिता अधाऊ, मुख्य कार्यकारी सौरभ कटीयार यांच्या नेतृत्वात हे सर्वेक्षण कार्य पार पडले. या कार्यात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सातत्यपूर्व मार्गदर्शन आणि सहकार्य केले. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता व त्यांची टीम, समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आदिंचा यात सहभाग लाभला.
या कार्यक्रमात एकूण १४ श्रेणीत विविध व्यक्ती तसेच शासकीय व अशासकीय संस्थांना
वर्ष २०२१ च्या ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कारा’ने गौरिविण्यात आले. यामध्ये अकोला जिल्हा परिषदेसह महाराष्ट्रातील दोन व्यक्तींचा समावेश आहे…