(तुकाराम राठोड/जालना)
प्रतिनिधी:(जालना)आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास राष्ट्रीयकृत व सहकारी बँका मराठा समाजातील तरुणांना कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास हेतुपुरस्सरपणे टाळाटाळ करीत असून,तात्काळ कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे संबंधित राष्ट्रीयकृत व सहकारी बंकांचे व्यवस्थापक यांना निर्देश देण्याची मागणी भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब पाटील कोलते यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री मा.ना.डॉ.भागवत कराड यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात कोलते यांनी म्हटले आहे की,मराठा समाजातील तरुणांनी उद्योग व्यवसाय सुरु करून स्वत:च्या पायावर उभे राहावे यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापन करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या मोठ्या प्रमाणात ठेवी राष्ट्रीयकृत बँकामध्ये ठेवण्यात येतात राष्ट्रीयकृत बँकांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत दाखल केलेले कर्ज प्रकरणाचे प्रस्ताव तात्काळ मंजूर न करता राष्ट्रीयकृत बँकाचे व्यवस्थापक हे कर्ज प्रकरण मंजूर करण्यास तरुणांना टाळाटाळ करीत आहे.
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सुधारित योजना राबविण्याबाबत कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाने दि.२१ नोव्हेंबर २०१७ रोजी शासन निर्णय काढून सूचना दिलेल्या आहेत,तसेच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती सुचिता भिकाने हिने शाखा प्रबंधक,शाखा व्यवस्थापक,जिल्हा शिखर बँक यांना पत्र देऊन महामंडळाअंतर्गत येणारे कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे आदेश दिलेले असतानाही सुद्धा राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक व बँक कर्मचारी हे मराठा तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यापासून वंचित ठेवत आहे.आतापर्यंत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील तरुणांनी महामंडळाकडे ऑनलाईन प्रस्ताव दाखल केले व पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव बँकेच्या व्यवस्थापकाकडे दिले.परंतु बँक व्यवस्थापकाच्या असहकार्यामुळे व हलगर्जीपणामुळे मराठवाड्यातील अनेक मराठा तरुणांचे कर्ज प्रस्ताव प्रलंबित आहे.
तरी तात्काळ आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील कर्ज प्रस्ताव प्राप्त झालेल्या मराठा तरुणांना तात्काळ कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे संबंधित बँक व्यवस्थापकांना निर्देश देण्यात यावे.अशी मागणी भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब पाटील कोलते यांनी केली आहे.