नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-
विविध सामाजिक उपक्रम व भारतीय सण-उत्सवांच्या माध्यमातून महिलांमध्ये एकात्मता व एकोप्याची भावना वाढविण्याचा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून नांदुरा शहर भाजपा महिला आघाडी व राष्ट्र सेविका समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारचे सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने आज बुधवार दि. ०३/०२/२०२१ रोजी हळदी कुंकू व तिळगुळ, श्रीराम दीपोत्सव व महिला सक्षमीकरण या सांस्कृतिक, अध्यात्मिक व सामाजिक मांगल्याचे प्रतिक असणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन नांदुरा येथील श्री राम मंदिर, नागलकर ले-आउट येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ. उज्वलाताई चैनसुखजी संचेती तर मान्यवर म्हणून भाजपा महिला आघाडी जिल्हाअध्यक्षा सौ. सिंधुताई खेडेकर, भाजपा महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस सौ. अलकाताई पाठक, भाजपा महिला आघाडी जिल्हा सोशल मीडिया संयोजिका नंदिनीताई साळवे ह्या उपस्थित होत्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आराध्य दैवत प्रभु श्री राम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन होऊन महिलांना हळदी कुंकू व तिळ गूळ वाटप उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सलोख्याचे महत्व प्रतिपादीत करण्यात आले. त्यानंतर अयोध्या येथे साकारल्या जाणाऱ्या भव्य श्री राम मंदिर उभारणीच्या पार्श्वभूमीवर श्रीराम दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी व मान्यवर यांच्याकडून महिलांना विविध सामाजिक बाबींवर महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
नांदुरा शहर व परिसरातील तसेच ग्रामीण भागातील विविध क्षेत्रातील असंख्य महिलांच्या उपस्थित पार पडलेल्या या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळून महिलांच्या सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचे महत्व अधोरेखीत झाले. या कार्यक्रमासाठी सौ. शीतल ताई डागा यांनी रेखाटलेली प्रभू श्री राम यांची अद्वितीय रांगोळी ही वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी नांदुरा शहर भाजपा महिला आघाडी व राष्ट्र सेविका समितीच्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी परिश्रम घेतले.