पत्रकार नवनाथ खिलारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

 

पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्काराने नवनाथ खिलारे सन्मानीत

पंढरपूर प्रतिनिधी: नवभारत वृत्तपत्र समूहाचे दैनिक नवराष्ट्रचे पंढरपुर प्रतिनिधी पत्रकार श्री नवनाथ खिलारे यांना सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शिवतिर्थावर ७ एप्रिल रोजी हा सन्मान सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक श्री चंदुलाल बियाणी तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मुंबई प्रदेशअध्यक्ष श्री वसंत मुंडे उपस्थित होते.संपूर्ण राज्यभरातील अनेक प्रख्यात पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
गेल्या महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथील पत्रमहर्षी स्व. मोहनलाल बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.

यात पंढरपूरचे ज्येष्ठ पत्रकार श्री नवनाथ खिलारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी ६ वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ या ठिकाणी पत्रकार नवनाथ खिलारे यांना प्रदान करण्यात आला आहे.

पत्रकार नवनाथ खिलारे यांनी आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली असून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शब्दगौरव केला आहे. समाजातील घटकांना समाज कार्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्या समाज कार्याला विशेष बळकटी देणारा पत्रकारीतेचा एक नवीन प्रघात त्यांनी समोर आणला आहे.

त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व दैनिक मराठवाडा साथी यांच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या इतर मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.

पत्रकार नवनाथ खिलारे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Comment