शेतात रक्षा विसर्जन अन कर्मकांडाला मूठमाती!- अभयसिंह मारोडे

 

 

सूर्या मराठी न्यूज ब्युरो 

जितेपनी नाही अन्न। मेल्यावर पिंडदान काय कामाचे.

या तुकोबांच्या विचाराला अनुसरून मी माझ्या वडिलांना त्यांच्या मृत्यूनंतर आदरांजली वाहिली.माझे वडील 28 सप्टेंबर ला दुपारी 3 वाजताच्या सुमारास निधन झाले.वडील तसेही सत्यशोधक विचारांचे आणि तोच त्यांचा वैचारिक वारसा आमच्या कुटुंबात वृद्धिंगत होत गेला.आणि म्हणूनच त्यांचा मृत्यू सोहळा सकारात्मक पद्धतीने करण्याच्या प्रयत्नात होतो.

आणि सामूहिक कुटुंबातील सर्वांचं यावर एकमत झालं की अण्णा(माझे वडील)च तेरवी करायची नाही.आणि अंत्यविधी झाल्यावर दुसऱ्या दिवशी सावटण्याच्या दिवशी अण्णांची रक्षा/अस्ति ह्या आपल्याच शेतशिवारात टाकायच्या.

आणि त्याच दिवसापासून कुठल्याही प्रकारचा विधी न करता आपल्या आप्तेष्टांना सुतक या संकल्पनेतून बाहेर पाडायचे.मला वाटते ही बाब फक्त मराठा समाजासाठीच नव्हे तर इतरही समाज बांधवांनी अंगिकारून महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे अनुयायी होण्यासाठी प्रयत्नरत राहावे.

आमच्या एकत्रित कुटुंबातील सर्व आत्या, आमच्या बहिणी ,घरातील सर्व सुना यांच्या सोबत आम्ही यासंदर्भात विचारविनिमय करून आम्ही हा निर्णय अंगिकारला व तो अंमलात आणला.आणि सामाजिक प्रबोधन करतांना ते आधी आपल्या घरातून आणि आपल्या कृतीतून जर आपण सुरू केले तर त्याला किंमत प्राप्त होते.अन्यथा लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि आपलं कोरड पाषाण असे व्हायला नको.

जिवंतपणी अण्णा ची काळजी संपुर्ण कुटुंबाने जिव्हाळ्याने घेतली त्यात प्रामुख्याने माझी आई,दोन्ही काकाकाकू,आमच्या आत्या,आतेभाऊ आते बहिणी,मामेभाऊ,आम्ही सर्व 5 भाऊ ,आमच्या 7 बहिणी जावई आणि आमच्या परिवारातील 5 सुना ह्यांचा समावेश आहे.अण्णाने आपली इच्छा प्रकट करावी आणि ह्या सर्वांनी ती आपसूकच पूर्ण करावी.तब्येत अंत्यत खालावलेली असून पण अण्णा गेली सात महिने अण्णा जे आपल्या सोबत होते ते याच सर्वांच्या सामूहिक प्रयत्नामुळेच आणि मला वाटते सामुहिक/ एकत्रित कुटुंबाचा सर्वात हा सर्वात मोठा impact आहे.

अण्णाचे शेतीवर खूप प्रेम म्हणूनच त्यांचा अंत्यविधी शेतात पार पाडला दुसऱ्याच दिवशी त्यांच्या अस्ति आम्ही आमच्या शेतात टाकल्या कारण एका शेतीवर प्रेम असलेल्या व्यक्तीसाठी त्याच्या शेता एवढे पवित्र स्थळ कोणतेच असू नाही शकत. आणि ज्या ठिकाणी अण्णाना दहन दिलं त्याच ठिकाणी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झाडं लावली.

अण्णांना घरातील सर्व महिला वर्गाने खांद्या दिला त्यामध्ये सुना,बहिणी,आतेबहिणी यांचा समावेश होता.
आमच्या मारोडे कुटुंबाने माझ्या बाबांचा मृत्यू हा एक सोहळा म्हणून साजरा केला.

समस्त समाजव्यवस्थेत काम करणाऱ्या मंडळींना आमचे हे च सांगणे राहील की,घरातील व्यक्तीच्या मृत्य अगोदरच त्यांची सर्व प्रकारची काळजी घ्या आणि मृत्यूनंतर कुठल्याही प्रकारचा विधी न करता त्या नंतरच्या सर्व कर्म कांडाला मुठमाती द्यावी.

 

Leave a Comment