महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करणे आवश्यक – प्रा. कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर विद्यापीठात प्राचार्यांची सभा संपन्न
शेगाव अर्जुन कराळे
(दि. 26.09.2023)
देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाले आहे. विद्याथ्र्यांच्या भविष्याचा विचार करता तसेच शैक्षणिक दर्जा वाढविण्याच्यादृष्टीने प्रत्येक महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांनी केले. विद्यापीठाचा आय.क्यु.ए.सी. विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठात प्राचार्यांची सभा संपन्न झाली, त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. नलिनी टेंभेकर, प्रशासन अधिकारी श्री राम राठोड व विद्यापीठ आय.क्यु.ए.सी. संचालक डॉ. संदीप वाघुळे उपस्थित होते.
प्र-कुलगुरू पुढे म्हणाले, विद्याथ्र्यांना शिक्षणासह भौतिक सुविधा मिळाव्यात, त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, याकरीता प्रत्येक महाविद्यालयांनी नॅकला सामोरे जाणे आवश्यक आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शैक्षणिक सुधारणेवर भर देण्यात आला असून शासनाने नॅक मूल्यांकन करणे बंधनकारक केले आहे.
ज्या महाविद्यालयांनी अद्यापपर्यंत नॅक मूल्यांकन केले नाही, त्यांनी लवकरात लवकर नॅक मूल्यांकन करावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
सहसंचालक डॉ. नलिनी टेंभेकर म्हणाल्या, पुढच्या वर्षीपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्येक महाविद्यालयांमध्ये राबवावयाचे आहे. त्याकरीता प्रत्येक महाविद्यालयाने नॅक करुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे. नॅक मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयांकरीताच शासनाची धोरणे असून ज्या महाविद्यालयांनी अद्यापपर्यंत नॅक मूल्यांकन केले नाही, त्या महाविद्यालयांची यादी सुद्धा शासनाला कळविण्यात यावी, असे शासनाने निर्देश दिले असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
सभेमध्ये नॅकविषयी मातोश्री सायरबाई चंपालालजी चोपडा बी.एड. महाविद्यालय, खामगांव, बुलढाणाचे प्राचार्य डॉ. गजानन शर्मा, हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळचे प्रतिनिधी, लोकहीत बी.पी.एड. महाविद्यालय, यवतमाळचे डॉ. अमोल देशमुख, स्व. पंचफुलाबाई पावडे कला, वाणिज्य महिला महाविद्यालय, वरुडचे प्रतिनिधी, युवाशक्ती कला व विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचे प्राचार्य डॉ. अजय गुल्हाने, ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान रात्रकालीन महाविद्यालय, यवतमाळचे प्रतिनिधी, कला महाविद्यालय, वाढोणा, नांदगावचे डॉ. राहूल तट्टे, राजमाता जिजाऊ महिला महाविद्यालय, नेर, जि. यवतमाळचे डॉ. सुधाकर तनवारे आदींनी विचारलेल्या प्रश्नांची प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, सहसंचालक डॉ. नलिनी टेंभेकर, प्रशासन अधिकारी श्री राम राठोड व आय.क्यु.ए.सी. संचालक डॉ. संदीप वाघुळे यांनी समर्पक उत्तरे देवून त्यांना नॅक मूल्यांकन करावे, असे सांगितले. सभेला संलग्नित महाविद्यालयांचे संस्थाध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक तसेच त्यांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.