आजारी काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा तज्ञांचा सल्ला
ऋषिकेश सुरवसे उमरगा/धाराशिव
उमरगा शहरासह तालुक्यात कधी ऊन तर कधी पाऊस अशा वातावरणातील बदलामुळे शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असून, त्यामुळे ताप, सर्दी, खोकला यासारख्या साथीच्या आजारांनी डोकेवर काढल्याने दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात विशेष करून लहान मुले व वृद्ध नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे वैद्यकीय तज्ञाकडून सांगण्यात येत आहे. पावसाळ्यातील बदलत्या हवामानामुळे डेंगू, मलेरिया, गॅस्ट्रो, वायरल फिवर, टायफाईड यासारख्या साथीच्या आजाराचे प्रमाण अधिक असते. सध्या सकाळी गार, दुपारी गरम आणि सायंकाळी ढगाळ अशा या बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्याच्या आजाराने त्रस्त रुग्ण दिसून येत आहेत.
पावसाळ्यात संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर फिरत असताना नियमित मास्क वापरावे, ज्या रुग्णांना मधुमेहाचा किंवा दम्याचा त्रास आहे, अशा रुग्णांनी लसीकरण करून घ्यावे.
तर दुसरीकडे ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिगारे, सांडपाण्याची डबकी तसेच घराच्या परिसरात डासांची उत्पत्तीत मोठी भर पडली आहे.
त्यामुळे साथीच्या विविध आजाराने डोके वर काढले आहे. पावसाळ्याच्या दिवसात विषाणूजन्य संसर्गाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे तज्ञ सांगतात.








